Friday, August 10, 2007

Let your work speak for you

२० वर्ष ... हो जवळपास २० वर्ष झाली हे लाकूड हातात घेवून मी इथं मैदानात उतरलो. त्या पहिल्यादिवसापासनं आजपर्यंत हा घणाणती टोला असाच आहे. आला चेंडू की दे दणका ... शाब्बास पठ्ठे. कुणाला पटो की ना पटो .. आवडो की ना आवडो ... आपल्याला भारी आवडतं. आजवर जे काही केलंय आणि करत राहीन. मला जोवर सार्थ अभिमान असेल, तोवर हे असच चालणार. तुम्हाला नाही ना पटंत ... मग निघा ना आपल्या वाटे. मी का तुम्हाला निमंत्रण दिलय की "यारे बाबांनो .. मी खेळतोय तर जरा बघायला या." आरे जा ना! ही बॅट पकडली तेंव्हा काय मला तुम्ही सांगितलं होतं ... "हे बघ सच्या, हा शॉर्ट बॉल आला ना की हा असा खेळायचा ... आणि ती फ़ुल्लीश डिलीवरी आली ना की ही अशी द्यायची ..." मग आज का सगळे जण असे उलटतपासणी असल्यागत माझ्या प्रत्येक शॉट वर कॅमेरा लावून बसलेत. आरे मी खेळतो, एन्जॊय करतो, तुम्ही ही करा ना. ११ गावची ११ पोरं आम्ही ... कशी एकत्र येवून आपल्या देशासाठी खेळतो, तुमच्या आणि माझ्या आनंदादाखल खेळतॊ. मग सपोर्ट करा ना. की तुमचा सपोर्ट असाच बुजळा ... जिकलॊ की आम्ही तुमचे "हिरोज इन ब्लू" आणि नाही जमलं कधी तर अगदी गल्लीगल्लीत आमच्या नावाच्या बोंबा.

कोण रे ते? कोण म्हणाला की "मी आजकाल दणके देत नाही"? आरे मानला .. दणके कमी झाले असतील ... पण म्हणून काय मी कुचकामी झालो, दुबळा झालो. आरे तोंड उघडायच्या आधी जरा ऍनालिसीस तरी करायचं ... थोडीशी कारण मिमांसा केली असती तर असे नसता ओकला. २० वर्ष तुम्हा लोकांना रिझवलं ते का असंच fluke होतं. वयासोबत आणि अनुभवासोबत न बदलणारा तो माणूसच कसला? ’नवं शिका आणि जुनं सुधारा’ हाच आपला गुरूमंत्र. मग एक सिनीअर प्लेयर म्हणून थोडं शांत व्हायला नको? की आजही तेच करू ... आला चेंडू की दे दणका. साला, तेंव्हा दणका देतादेता आऊट झालो तर तुम्हीच सगळे "चु चु चु" करायचे ... पस्तावायचे ... म्हणायचे "यार सच्या नको आऊट व्हायला पाहिजे होतास". आत्ता तसा बाद होवू दे बरं मला! आरे तुम्ही टिव्हीसमोर बसून हासडलेल्या शिव्या आणि शाप मला त्या मैदानावर ही ऐकू येतात. "तिच्या आयला, हा सच्या ना काही कामाचा नाही. बिनभरवशाचा बैल आहे साला. काढून टाकायला पाहिजे ... " आणि कायच्या काय . म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तरी काय ... मी खेळू की नको खेळू? असू देत तुमच उत्तर तुमच्या पाशी. तुम्ही ’नको’ म्हटल्यानं मी काही थोडीच सोडणार आहे. जोवर इथं जिगर मधे आग आहे तोवर हे असंच चालणार ... वेळ आली की उतर मैदानात आणि उतर कसोटीला खरा.

तो कपिल साला ... म्हणे ’सचीन मॅच-विनींग गेम कधी खेळतच नाही’!! अहोsss कपील ... तुम्हाला बोलतोय. मानलं .. हिंदूस्तानचा एक ग्रेट खेळाडू तू. विकेट्सचा विश्वविक्रम, हिदूस्तानचा पहिला वहिला आणि एकुलता एक विश्वकरंडक जिकणारा कप्तान आणि बरेच काही तुझ्या नावावर जमा आहे. आणि मी अगदी लहान असल्यापासनं तुझं खेळणं पहात आलोय. सुनिल, श्रिकांत वगैरेच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही टक्कर दिली सगळ्यांशी आणि त्याचा नेहमीच हेवायुक्त अभिमान वाटला मला. पण हे मला असं का म्हणून बोलणं. तुझ्या या अशा वागण्यानं मला तर काही फ़रक पडत नाहीच ... पण आपला one of the icons क्रिकेटर असा अद्वातद्वा वागला याचं वाईट वाटतं. वाटत ज्या माणसाकडं पाहून आपण वाढलो तो असा कसा असू शकेल. आणि मला सांग, मी नसेन कदाचीन मॅच संपेपर्यंत पिच वर, पण म्हणून का माझं योगदान कमी होतं. आणि अशा किती मॅचेस आहेत जीथं तू पिचवर आहेस म्हणून आम्ही आशा लावून असतो, आणि तू मात्र आपला टुकू टुकू करत सगळी मॅच घालवतोस. आरे त्या शास्त्री सोबत कितीवेळा अशा मॅचेस हारलो आपण. मग तेंव्हा कुठं होता तुझा हा तोरा. तो शोएब अख्तर म्हणे १०० मैलाची बोलींग करतो ... पण त्यालाही मी चेपलाच की. हा असा सहज six मारून मोकळा झालो. तुझ्या सारखा नाही अर्ध्या पिचपर्यंत जावून "well-left" नाही केला. मग का म्हणून हा दोष माझ्या माथी.

मागे जेंव्हा कादीरला झोडला तेंव्हा म्हण, किंवा त्या वार्नला चेपला तेंव्हा म्हण, हिरॊ कप मधली हिरोगीरी म्हण किंवा वर्ल्ड कप मधला damn good touch म्हण ... तेंव्हा का नाही तोंड उघडलं तुझं? आरे जर हक्कानं शिव्या घालयच्याच असतील तर हक्कानं स्तुतीही करायची ताकदही ठेवावी माणसानं. अशा वेळी उगीच वाटतं, माणसं "मोठी" झाली म्हणजे "मोठेपणा" विसरतात का? पण तसंही काही नाही. आरे ब्रॅडमननं स्वतः तोंडभरून कौतूक केलं तेंव्हा आभाळ ठेंगणं झालं होतं. जावू दे. मी काही इथं माझी बाजू मांडायला नाही आलो. पण म्हटलं एकदा तुझा गैरसमज दूर करायचा प्रयत्न तरी करून पाहू. तिकडं ते बिग-बी आणि शाहरूख असेच वागताहेत तुझ्यासारखे. मला एवढच म्हणायचंय ... तुझा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा. खेळाडूकडनं पर्वताएवढ्या अपेक्षा करून लोक इथं मॅच पहायला येतात. तिकीट काढून मॅच पहायला आले किंवा केबलवाल्याचे पैसे दिले म्हणून त्याची भरपाई आमच्याकडनं करू पहातात. आरे, प्रत्येक चेंडू अगदी सिमेबाहेरच गेला पाहिजे असं असेल तर मग तुझ्या सारख्या गोलंदाजाचं काय व्हायचं याचा कधी चुकून तरी विचार केलाय? क्रिकेट हा बॅट आणि बॉल यातलं द्वंद्व आहे. त्याला त्याहून वेगळं समजून, पर्सनल होवून भावनेचा भरात हवं ते बोलू नये. मागे एकदा तो इम्रान खान असाच ओकून गेला. त्याचं तेवढं वाईट नव्हतं वाटलं जेवढं तुझ्या इग्नोरन्सच वाटलं. काही झालं तरी तो पडला प्रतिस्पर्धी. माझ्या मनाचं खच्चीकरण करण हे त्याला क्रमप्राप्त होतं. आणि ते जाणून मी सहजपणे निभावून घेतलं. पण तूच असा जर घरभेदी वागू लागलास तर मग आम्ही बघायचं तरी कुणाकडे?

आणि तुला काय वाटतं. मला काही उलट उत्तरं देता येत नाहीत. पण शब्दाने शब्द वाढवणे आपल्या खाक्यात नाही. आपलं बोलणच थोडकं. "Let the work speak for you". त्या पाकिस्तानला जोर चढला होता २००३ वर्ल्ड कप मधे. म्हणे पाकिस्तानची टीम हिदुस्तानपेक्षा सरस आहे ... ए चिरकूट ... आरे जा. आजवर एकदा तरी वर्ल्डकप मधे जिंकलाय का आमच्या विरूद्ध? मग कशाचा एवढा नशा. सेहवाग आणि माझ्या जोरावर आम्ही मॅच जिंकली आणि बसले का शेपूट गां$#त घालून. मी म्हणतो आरे करून दाखवा ना दम असेल तर ... उगीच फ़ुशारकी कशाला मिरवायची? एक एक करत जवळपास ३० वेळा शतकं हुकली म्हणून रडत नाही बसलॊ. आज चुकलं, उद्या नाही चुकणार याच आशेवर खेळतोय.

जावू दे. "रोज मरे त्याला कोण रडे" अशातली गत होवून बसलीय. आणि तू जर असाच ओरडत रहाशील तर तुझं बोलणंही मी ’रोज मरे" category मधे टाकून मोकळा होईन ... मग एवरेस्टच्या शिखरावर उभा राहून, बेंबीच्या देठापासून, घसा फ़ाटेस्तोवर जरी ओरडलास तरी ते माझ्या कानाच्या पडद्यामागे पोचणार नाही.

आता शहाण्यासारखा वाग नाही तर वेड्यासारखा. निवड तुझी. पण तू जर तुझं iconic status टिकवून ठेवू शकलास तर मला मात्र अभिमान वाटेल.


**** सप्टेंबर ६, २००७ *******************************
हे पोस्ट लिहील्या पासनं सचीनची ४ शतकं हुकली. आता काय कपाळ फ़ोडायचं त्यानं.