Saturday, November 3, 2007

व्हाट अ वूमन वान्ट?

असं लिहायसारखं काही नाही. पण म्हटलं उगाच काहितरी भरकटत खरडण्यापेक्षा एखादा सांगण्यासारखा आठवणीचा प्रसंग निवडावा. आणि मग "अ" आठवणीचा तसा "अ" अथर्वचा. म्हणून म्हटलं त्याचाच एक गोड प्रसंग लिहावा. अगदी थोडक्यात.

आता "What a Woman Want?" या प्रश्नावर प्रत्येकाची आपापली मतं तयार झाली असतील ... आणि बऱ्याच जणाची (म्हणजे जवळपास सर्वांची) मतं अगदी एकसारखी असतील. आरे जो प्रश्न आजवर प्रत्येक पुरूषाला छळंत आलाय त्या विषयाला हात घालायचा म्हणजे अगदी तरण्या नागाच्या फ़ण्यावर हात ठेवल्यासारखं आहे. पण अगदी प्रामाणीकपणे सांगतो ... माझ्या ढोपरात नाही तेवढा दम ... लग्न केलं हेच खूप झालं .. त्या नंतर "बोलणे" हा प्रकार काय असतो हे ठावूकच नाही आणि तोंडाचा उपयोग फ़क्त (दिलं ते) खाण्यासाठी असतो एवढच ठावूक. (आणि म्हणूनच की काय मला ही ब्लॉगायची सवय लागली ... उगीच मनाचा आपला दुधाची तहान ताकावर भागवायचा कयास)

हिवाळा म्हटलं की एका जागी बसून बुडं गरम करण्या पलिकडं काही काम नसतं. आजुबाजुची टवाळ टाळकी जमा करायची आणि रात्री जागून काढायच्या. एखादा पिक्चर (संवेदच्या भाषेत भंपी), किंवा पत्ते, किंवा अशाच रंगतदार गप्पा .... आणि मग सगळ्या शादीशुदा लोकांच्या रंगतदार गप्पा त्या कशावर असणार ... बरोबर ओळखलंत "बायको" .. अगदी म्हणजे आमच्या सगळ्यां बायकांचा देखील (प्रत्येकी एक बायको ... उगीच "आमच्या सगळ्या बायका" या वरनं गैरसमज नको व्हायला. इथं काही "समज"लं तर ताप होतो ... "गैरसमज"लं तर वाटच लागायची).

तर मागल्या शुक्रवारी असेच आम्ही काथ्या कुटत बसलेलो ... आणि हळूहळू विषय घसरला "पोरींना काय आवडतं". हो घसरलाच ... कारण स्वत: होवून तर एखादा लग्न झालेला नवरा प्राणी अश्या "जीवघेणा" विषयाला हात घालणार नाही. आता विषय सुरू झाला म्हणजे पुढे काय चालू असेल ते काही मी इथं सविस्तर लिहायची गरज नाही. सर्वांना ठावूक असेलच ... आणि ज्यांना ठावूक नसेल त्यांच्यासाठी २ पर्याय ... एक तर गुगल करा .. नाहीतर लग्न करा. शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरू, अगदी गुगलपेक्षाही. तेंव्हा पर्याय २ योग्य .... "योग्य?" .. हंsssss

तेवढ्यात ... बाजुला बसून काहितरी खटाटोप करणाऱ्या माझ्या अमेरिकन (इथं "अमेरिकन" हा उल्लेख त्याच्या नागरिकत्वाबद्दल नाही ....तर त्याच्या विचारसरणी बद्दल) पोरानं मधेच उडी टाकली ... आणि अगदी कॉन्फ़िडॆंटली सांगीतलं ... "I know ... they like dogs."

झालं ... अगदी आणिबाणी लागावी अशा स्तराला पोचलेलं आमचं डिस्कशन विनोदयात्रेत जावून पोचलं. बट ही इज सो राईट ... "they like dogs"

**************************************

प्रामाणिक खुलासा: या पोस्टमागे स्त्रीवर्गाला किंवा कुत्रा या स्वजातीयाला दुखावण्याचा यत्किंचीतही उद्देश नाहीये. तेंव्हा उगाच "गैरसमज" करून घेवू नयेत. स्त्रीवर्ग आणि कुत्रा या दोन्हीबद्दल मला अमाप आदर आहे, माझं स्वतःवर अफ़ाट प्रेम आहे आणि जगण्याची इच्छा आणखी शाबूत आहे. तेंव्हा नेहमीच्या सवयीनुसार (स्त्रीवर्गाने) हा पोस्ट पर्सनली घेवून गैरसमजाला बळी जावून (माझा) बळी पाडू नये.