Tuesday, July 24, 2007
उगीच आपलं लिहावसं वाटलं म्हणून
काय चाललय काही समजत नाहीये. ऑफ़ीसच्या उचापत्या (म्हणजे नियमीत काम ... बाकी उपद्व्यापात आणि उचापत्यात मला तसा इंटरेस्ट नसतोच मुळी ... "आपण भले आपले काम भले") सांभाळता सांभाळता दिवस संपून जातो आणि रात्री झोपताना जाणवतं आज लिहायचं राहून गेलं. मनाला हुरहुर लागून रहाते. मग "उद्या लिहायच" असं ठरवून झोपी जायचं .. आणि उगवत्या सुर्यासोबत परत त्याच उचापत्या ताटात घेवून दिवसभर या डबड्यासमोर खटखट करत बसायचं ... परत रात्री पाठ टेकेपर्यंत.... छ्या ... जाम वैतागलोय. आणि म्हणून आज म्हटलं ... आज ऑफ़ीसमधे बसूनच लिहायचं. (ठावूक आहे की हे काही लगेच लिहून संपणार नाहीये म्हणून ... पण साला सुरूवात तर करू).
देवाशपथ सांगतो ... इतकं लिहावसं वाटतं की कधी कधी तर स्वप्नात ब्लॉग लिहून होतो ... आणि सकाळी उठलं की पाटी पुसून ठेवल्यासारखी दिसते .. आणि असा तो दिवस एकदम बेकार जातो. दिवसभर मनाला बोचत रहातं abortion करून आल्या सारखं. एक ब्लॉग जन्मण्याआधीच संपल्याचं दुःख्ख बोचत रहातं. आजचा दिवस असाच. पण म्हटलं आजची बोच जरा वेगळ्या पद्धतीने हाताळावी. नेहमी दिवसभर कुजत बसतो. पण आज म्हटलं जरा वेगळं ... का म्हणाल तर त्याचं inspiration Deb कढणं घेतलंय. Deb म्हणजे Everybody Loves Raymond मधली Debra. परवाचा भाग Ray च्या mid-life-crisis वर होता. आता हा coincidence महत्वाचा कारण आजकाल आम्हीही त्याच गल्लीत फ़िरतोय. असो, तो विषय वेगळा. इथं संदर्भ एकढ्यापुरताच की, त्या भागात Ray ला mid-life-crisis चा बोध होतो आणि तो असा काही वागतो, जसा काही आता संपणारच आहे आणि आयुष्याला काही अर्थच शिल्लक नाहिये. त्या वेळी Deb त्याला सांगते, मिड लाईफ़ क्रिसीस सर्वांनाच असतो ... पण महत्वाचं असतं ते म्हणजे आपण तो हाताळतो कसा. असो.
मागल्या दोन वर्षापासनं मी ऑफीसच तोंड नाही पाहिलय. घरनंच काम करतो. त्यामुळे तिथं काय चालतं हे ठावूक नव्हतं. पण आता भन्नाट बोअर व्हायला लागल होतं घरी म्हणून म्हटलं चला जरा तिथं जावूनही पाहू. म्हणून सुरुवात केलीय. आता आवडेल की नाही ठावूक नाही .. पण ट्राय मारायला काय हरकत आहे. खरं सांगू, असं काही ट्राय मारायचं म्हटलं की डोक्यात झिणझीण्या येतात. असंच ट्राय मारायचं म्हणून लग्नाच्या फ़ेऱ्या मारल्या .. आज पर्यंत अडकलोय. असो. (लग्न आणि बायको या बद्दल इथं काही लिहीत नाही. परवा आमच्या सौ नी माझं लिखाण वाचलं आणि बाकी सगळ्या कमेंट एकीकडं करून कमेंट दिली, ती ही इन पर्सन ... "असं प्रत्येक ब्लॉगमधे का माझ्याबद्दल ओरडतोस. मी काय तुला इतकी ....." ... असो. विषय बंद ...)
हं. तर मला काय म्हणायचंकी मला लिहायचंय. आणि कशाबद्दल लिहायचं त्याचे ही जवळपास ३-४ ड्राफ्ट तयार पडलेत. पण कसं हजामच्या दुकानात हजाम कसा प्रत्येकाची अर्धी दाढी करून सगळ्यांना अर्धवट ठेवतो. तसे सारे ब्लॉगचे तुकडे पडलेत. एकदा बसून निट लावायला पहिजेत.
अभिजीत बाथेनं मागे एकदा लिहीलं होतं ... "रिदम पाहिजे..." काय भन्नाट लिहिलंय माहिती .. .अगदी तसं काहीतरी होतंय. सुचतंय बरंच, पण साला शव्दात उतरतच नाहिये. पण यू नो, सुरूवात केली की गाडी घरंगळत रहाते .. म्हणून हा असा विखुरलेला ब्लॉग.
आता इथं संपवतो आणि लवकरच एखादया ड्राफ़्टचा पक्का ब्लॉग तयार करून तुमच्या माथी मारतो. मग वाचा नाहितर न वाचा. तुमचा प्रश्न.
Sunday, June 24, 2007
भकास रात्र
आजचीच गोष्ट घ्या. अथर्वचा ४था वाढदिवस साजरा केला, दिवसभर थकून आडवा झालोच होतो आणि दारावर बेल वाजली. म्हटलं कोण असेल या वेळी. नाही म्हटलं तरी रात्रीचे २ वाजलेत. अशावेळी दार तर सोडाच, पण फोनची घंटा जरी वाजली तरी दचकायला होतं. मन कावरं बावरं झालं. पण जावून दार पहाणं आवश्यक होतं. म्हणून गेलो आणि दाराची कडी किलकिली करून पाहिली ... तर खूद्द जगजीत होता. म्हटलं, बाबा रे तुला काय चित्रा न हाकललं का गालीब नकोसा झालाय म्हणून तू अशा अवेळी ईकडं तडफ़डलास. तर म्हणे, मला ऊचकी लागली, मला वाटलं तुला आठवण झाली, म्हणून आलो. आणि वेड लागल्यागत गायला लागला ... "वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता ... किस घर मे खुशी..." झालं बोंबललं ... अख्ख्या रात्रीचं खोबरं करून टाकलं. त्याचा जड आवाज ऐकतच होतो तेवढ्यात आतनं आमची लता मंगेशकर म्हणाली, "कोण आहे आता ... झोप ना प्लीज". म्हटलं "बाईगं, तू होवून जावू देत तुझी झोप, माझी उडालीय." आणि मग परत जगजीतच्या सुराशी सुर जुळवला.
"वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता, किस घर मे खुशी होती हैं मातम नहीं होता"
खल्लास. आयुष्याकडच्या सुखाच्या सगळ्या अपेक्षा गळून पडल्या. मी जगत असलेल्या या क्षणाचा अर्थच बदलून गेला. आणि मन कुठ तरी खोल रुतून बसलं. आयुष्यात नाही म्हटलं तरी सुखच सर्व काही नाहिये असं सांगणारा जगजीत माझ्या डोक्यात घुमत राहीला बराच वेळ. गौतम बुद्धांनंतर असं काही सांगणारा हाच.
"ऐसेभी हैं दुनियामे जिन्हे ग़म नही होता, इक ग़म हैं हमारा जो कभी कम नहीं होता"
ना! दुःख्ख कुणाला नसतं. अगदी सर्वांनाच असतं. पण प्रत्येकाला आपलं दुःख्ख मोठं वाटतं. "माझीच लाल" म्हणणारी मंडळी आपण, इथंही मागं हटायला तयार नसतो. तुला एक तर मला दोन, तुला दोन तर मला दहा त्रास. आरे कुणाला सांगतो तुला काय होतंय ते. इथं माझंच आणखी सरलं नाही .. चल हो बाजुला, मला जरा माझ्या दुःख्खाला वाट करू देत.
"क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते, क्या मेहंदी लगे हाथोंसे मातम नहीं होता"
अगदी व्याकुळ झालं डोळ्यातनं अश्रु गाळायला. चटकन डोळ्यासमोर ती नवविवाहीत विधवाच आली. तीचं ते सगळं उद्वस्थ आयुष्य दिसायला लागलं आणि मन ऊद्विग्न झाल. मेहंदीने रंगलेले हात आणि रक्तानं रंगलेले डोळे ... नकोसं झालं ते चित्र ... सगळच कसं भकास दिसायला लागलं ... मनातली विलक्षण पोकळी भरायची कशानं तेच सुचेनास झालं.
"कुछ और ही होती हैं बिगडनेकी अदायें, बनने ही संवरने ही मे आलम नहीं होता"
छ्या ....! मन कुठं तयार होतं हे ऐकायला. ते मागल्याच ओळीवर अडकलं होतं. आणि माझा कुत्रा झाला होता. रात्रीच्या ३.०० ला देखील त्या विधवेच्या आयुष्याची राखण करायची जबाबदारी असल्यागत तीच्या भोवतीच फ़िरत होतं. "क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते" ... क्यों नही गिरते, जरूर गिरते हैं. लग्नानंतर बापाचं घर सोडून जाणारी ती बाला कोण रडते. आजपर्यंतची सारी खरी खोटी नाती मागे सोडून नवीन आयुष्यात पाय ठेवायचं दिव्य करायचं म्हणजे काय सोपं नाय. अगदी अनोळखी माणसावर विश्वास ठेवून पुढल्या आयुष्याची स्वप्नं रंगवताना येणारे नको ते विचार तीच्या मनाला कोण पीळ पाडत असतील. आणि असं सुरूवातीलाच सरणाला आग द्यायची म्हणजे त्याचा दाह अंतःकरणापर्यंत पोचणारच. आयुष्याएवढं मोठ दुःख्ख ते ("आभाळा"एवढं म्हणून ते दुःख्ख लहान करण्याची हिम्मत नाहीये आपली), ते पचवायचं म्हणजे बाईचं ह्र्द़य असायला पाहीजे. आणि अशावेळी मी स्वतःला नशीबवान समजतो की पुरूषाच्या जन्माला आलो. देवाशपथ, आपल्यात ताकद नाहीये हे असं काहीतरी सहन करायची. किंवा मग कदाचित देव स्त्रीजन्म देताना ते हवं असलेलं (की नको असलेलं म्हणू) धैर्यही देत असेल.
Anyway, देव करो आणि असा ग़म दुनियात कुणालाच न देवो.
पण एक न ऊलगडलेलं कोडं म्हणजे अशा शुभ दिनी मला हे असं जगजीतने का पछाडावं. आरे मेलं तरी पुरतील इतक्या सुंदर रोमटीक गझ़ल्स आहेत, मग हेच का भोसडायचं होतं तुला ... आणि तेही इतक्या रात्री. जा ना बाबा ... चित्राकडं जा आणि तीला म्हण, "ये करे और वो करे, ऐसा करे, वैसा करे ... " .. जैसा करायचंय वैसा कर .. पण इथनं निघ... हं, निघाला बिचारा शेवटी ३.४५ ला. .... डोळे जड झालेत माझे ... कदाचीत न झोपल्यानं असतील किंवा त्या विधवेचे डोळे उतरले असतील माझ्या डोळ्यात ... थकायला झालंय. "बाय". ये परत कधीतरी. टेकतो आता.
[नोट: कुणीतरी मला "बर्याचदा" किंवा "करणार्या" हे शब्द मराठी फ़ॉन्ट मधे कसे लिहायचे त्याच key sequence सांगा रे प्लीज. या "र" आणि "य" च लग्न मला लावताच येईना झालंय]
Friday, June 1, 2007
४ वर्षाचा सवाल!
अगदी परवाचीच गोष्ट. डिनर टेबलवर आमची हॅप्पी फ़ॅमीली (म्हणजे चिरंजीव, विजू आणि मी) "गिळायला" बसली होती. "गिळायला" हा शब्द महत्वाचा कारण जेवणाकडं कमी आणि गिळण्याकडंच जास्ती लक्ष होतं. बायकोनं परत आम्हाला गिनिपीग बनवायच्या ऊद्देशानं काहीतरी नविन पदार्थ ताटात टाकला होता. (खरंतर "विक्षीप्त" किंवा "विचीत्र" म्हणावसं वाटतंय, पण लहाणपनापासनं मातोश्रींनी शिकवलंय "जेवणाला नावं ठेवू नयेत" .. म्हणून संयम ठेवून "नविन" म्हणंण आलं) तेंव्हा "कसं झालंय" हा अतिशय प्रिय (यातला "तिशय" silent) प्रश्न कानावर पडण्याआधी ताटातलं पोटात टाकून आपला computer घेवून बसावा हा ऊद्देश. पण जे नशिबात लिहून आलंय ते टाळंणं का माणसाच्या हातात आहे (बायकांच्या असेल कदाचित). पोटातला अग्नी जरासा थंड पडला होता तेवढ्यात खडा सवाल, अगदी प्रेमळ आवाजात कानावर धाडकन येवून आदळला - "आवडलं?". (नेमक्या अशाच वेळी कसा तीला आवाज प्रेमळ काढता येतो हेच मला कळंत नाही. बाकीवेळा कानाची ओंजळ करून जरी वाट पाहिली तरी आवाज थोडादेखील प्रेमळ निघत नाही. anyway, तो एकूण वेगळाच विषय आहे). हं, तर प्रश्न येवून आदळला ... आणि घशातला घास घशात, हातातला हातात आणि ताटातलं सगळं घशात घुसल्यासारखं वाटलं. पण हे expected आणि सवयीचं असल्यानं पटकन "हं हं" असं तोंडातून निघून गेलं. पण जसा मला प्रश्न सवयीचा, तसंच तीला ऊत्तर आणि त्यात ती हुशार, समजून गेली आणि पुढलं जेवण काय hot होतं म्हणून सांगू. जावू देत, माझ्या सार्या उपवर मित्रांना हे माहितीच असेल. असा विषय सोडून जायची माझी किंचीतही इच्छा नव्हती, पण "बायको" म्हटलं की नेहमीच विषयाला सोडून असतं ... असो ...
हं तर डिनर टेबलवर हे महाभारत चालू होतं आणि बाळराजे "मात्रुभाषे"त वदले ... "daddu, where did I come from". (आमचे सुपूत्र आम्हाला "daddu" म्हणून संबोधतात .. daddy नाही की dad नाही ... कुठून शिकले माहिती नाही ... पण daddu. anyway स्वतःच्या पोरान काही म्हटलं तरी छानच वाटतं. तरी ऊगीच नाही म्हणाले थोर - आपला तो बाबल्या आणि दुसर्याचं ते कार्ट). मग आम्हाला ते विचार करण आलं. घास चावता चावता डोकं खाजवणं चालू होतं ... पण अशा प्रश्नांची सरळ ऊत्तरं देणं आवश्यक आहे नाहीतर पुढे चालून महागात पडतं म्हणे. आणि मी म्हटलं "मम्माच्या पोटातून". वाटलं नेहमीप्रमाणे "ओह!" असा उद्गार बाहेत पडेल आणि थंड पडतील .. कसलं आलंय ... लगेच एक सवाल ... "i am so big,
mumma's tummy is so small ... how did I fit in there". आणि मग दुसरं सत्र डोकं खाजवायचं आणि उत्तराचं. मग बरेचसे "why / how / when" झाले ... माय आणि बाप कुतुहलानं पोराच्या प्रश्नाची ऊत्तरं देत राहीले ... आणि या सगळ्यात एक फ़ावलं ... बायकोच "आवडलं का?" विरघळून गेलं.
बरं आमचेच साहेब हुशार आहेत असंही नाही. बहूतेक वर्षे ३-५ हा वयोगटच मुळात जिद्न्यासू असतो. माझ्या एका मैत्रीणीच्या घरी तीच्या बहिणीसाठी स्थळ पहाण्याचा विषय चर्चेत होता. तीचा ४ वर्षाचा पोरटा सगळं कसं मन लावून ऐकत होता आणि मधेच मुंगी चावल्यागत ओरडला ... "आई, बाबानी कुणाशी लग्न केलं गं". तीनं अगदी गालावर पापा देवून, हसून ऊत्तर दिलं "माझ्याशी". पण पुढं जे ऐकायला मिळालं ते कदाचीन कुणाही प्रौढ व्यक्तीच्या विचारशक्तीच्या बाहेरचं होतं .... "वेडेच आहेत बाबा ... घरातच लग्न केलं. नाहितर मावशी बघ कशी बाहेत करतेय." झालं. अख्ख्या घरात हशा.
हेच नग एके दिवशी आईला, "आई याला काय म्हणतात गं?" आईनं तत्परतेनं सांगीतलं, "पापण्या". "कशाला असतात त्या?" लगेच दुसरा प्रश्न." आईनं त्याच तत्परतेनं सांगीतलं, "डोळ्यात काही जावू नये म्हणून". या ऊपर काय म्हणाले असतील महाशय? "काही उपयोग नाहीये त्यांचा. डोळ्यात काही जावू नये म्हणून असतील तर मग अशा बाहेर कशाला आहेत ... खाली पाहीजेत ना ...". झालं. बिचारी आई खर्या अर्थानं अबला होवून निरूत्तर. पण त्या दिवसाआधी त्या आईला पापण्यांचा आकार कधीही जाणवला देखील नसेल.
असंच एका शुक्रवारच्या रात्री मी आणि विजू बोलत बसलो होतो. विषय होता "विकेंडला काय करायचं". इथं अमेरीकेत हा एक सर्वात मोठा प्रश्न. आरे २ दिवसांचा विकेंड तो. पण माणसं सोमवारपासनं शुक्रवार पर्यंत तेच ठरवतात ... "विकेंडला काय करायचं". तसं म्हटलं तर नुसतं झोपून राहीलं तरी २४ तास असेच कटतील. पण बायको म्हटलं की एक तर झोपू देणार नाही, जागेपणी आपल्याला जे करायचंय ते करू देणार नाही आणि तर अर्ध्या तासाला खेटेल "सांग ना काय करायचं ऊद्या?" तर अशा या महाबिकट विषयावर आमचं debate चाललेलं. मी विचारा आठवडाभर काम करून ("काम करून" बायकोसाठी, खरंतर स्वतःला बिझी ठेवून जास्ती) थकलेला, म्हटलं "आराम करू. बरेच दिवस झाले चांगली झोप नाही झाली". झालं भडकली. "तुला तर आराम करण्याशिवाय काही सुचतंच नाही. काढ नुसत्या झोपा. त्याच्यासाठीच लग्न केलंस. आठवडाभर ही घरी आणि विकेंडला ही घरीच ठेव". मला माझी चूक कळली (किंवा कळविण्यात आली) .. आणि मी काही बोलायच्या आधीच आमजे हिरो बोलले, "mumma, you dont like daddu, then why did you marry him. Why don't you marry me". बरं झालं बोलले ... पुढलं महायुद्ध टळलं आणि विषय हलका झाला. "करते रे बाळा तुझ्याशीच करते पुढल्यावेळी" असं काहीतरी गोजिरवाणं बोलून जवळ घेतलं त्याला. मी म्हटलं, "बाईगं, त्याला जीतका जवळ घेतेस तीतका मला ही घे. विकेंड काय रोज फ़िरवीन" आणि हसण्यात वेळ मारून नेली.
तर असे एक आणि कितीतरी प्रश्न रोज माय-बापांना भंडावून सोडतात. पण एक मात्र खरं. असले ४ वर्षाचे सवाल माझ्यासाठी मात्र वरदान असल्यासारखेच असतात. प्रत्येक वेळा माझी सुटका करतात. म्हणून हिला बोलायचं झालं की मी त्याला जवळ घेवून बसतो. आपलं शस्त्र तयार असलेलं बरं, नाहितर गळा कापला जायचा एखादेवेळी गाफिलपणे.
म्हणून अथर्वला म्हणाव वाटतं ... बोल रे माझ्या राजा.... तू असाच बोलंत रहा.
Wednesday, May 30, 2007
B.D.L.C. : Blogger Development Life Cycle
"टर्रर्र" शब्दावरून लहाणपणीचा एक प्रसंग आठवतो. पाचवी सहावीला असेन तेंव्हाचा. आमचे मोठे बंधू दोन वर्षानी मोठे. आणि मोठे म्हणजे सगळ्याच क्षेत्रात "मोठे". बंधुराजांनी शाळेतल्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला - मग वक्त्रुत असो की वादविवाद, कथाकथन असो की कविता लेखन, आणि बरंच काही - पहीले (आणि क्वचितं दुसरे) आलेच म्हणून समजा. बरं साहेबांचा मान असा की बक्षीस वितरणामधे सर्वात शेवटी यांना निमंत्रण स्टेजवर. का तर सगळ्या स्पर्धेचं एकच मोठं बक्षीस मिळायचं. तर अशा या "पराक्रमी" (पराक्रमी नाहीतर काय ... ज्या रस्त्याला आमची पायधूळ लागणं वर्ज्य तीथं साहेब घोडे चौखूर दौडवायचे म्हणजे पराक्रमंच म्हणावा) भावाकडं बघून वाटलं आपण ही कथाकथानामधे भाग घ्यावा. कथा निवडली "ही मोठी माणसं अशीच" (त्याला ही कारण म्हणजे बडे बंधू या कथेमधे पहीले होते म्हणून ... नाहीतर आम्हाला चॉईस हा प्रकार कधी जमतंच नाही). स्पर्धा सुरू झाली .. एक दोन तीन .. "n" स्पर्धक आले गेले ... आणि हुश्शं .. आमचं नाव आलं. कसलं आलंय. पावलांना कसतरी फ़रफ़टत स्टेज पर्यंत पोचवलं (तिथपर्यंत पोचवायला देखील मध्ये आई बाबा होतेच .. जा बेटा (आणि वाट लावून ये) असा "धीर" द्यायला). पण म्हणतात ना, रक्तात पाहीजे ... माईक समोर ऊभा राहीलो आणि सुरू झालं ... "तुला गं (शांतता) तुला गं ( थोडी जास्ती शांतता) mmmmm .... तुला गं (आणि more शांतता) " आणि असे बरेचसे "तुला गं .. शांतता... तुला गं .. शांतता". गाडी पुढे सरकेचना. संपली कथा. लोकांनी टाळ्या वाजवल्या (त्या टाळ्यांचा अर्थ पुढे कळाला. त्या बालवयात sarcastic हा शब्द ठावूकंच नव्हता ना). तीथून जो काढता पाय घेतला तो सरळ ईंजिनीअरींगच्या send off पर्यन्त माईक समोर गेलोच नाही. तर संदर्भ असा की तेंव्हा जी फाटली होती तीच आत्ता परत एकदा. (म्हणजे ... तशी कळ सवयीची आहे,पण वेळ नाहीये. बराच काळ ऊलटलाय).
महिना झाला (किंबहूना जास्ती) ... डोक्याचा तंबोरा वाजून वाजून अगदी वाट लागलीय. कोण डोकं दुखतंय म्हणून सांगू. पण आज "एकांतात" विचार करत बसलॊ होतो म्हटलं काही झालं तरी आपलं इंटरनेट वरचं अस्तित्व सिद्ध करायचंच. बराच "जोर" लावून विषय सापडला (विचारवंतांना मी जो "एकांत" आणि "जोर" म्हणतोय त्याची सवय असेलच. बाकी मायबाप जनतेनं माफ करा, पण असं पब्लीक डोमेन वर ऊघड ऊघड बोलता येत नाही) - "ब्लॉगर डेवलेपमेंट लाईफ़ साईकल". म्हणजे काय तर विषय शेवटी मीच अणि माझ्यासारखे बरेच.
विषयाचा सार असा की .. एखादा ब्लॉगर निपजतो कसा? बुजतो, रुजतो आणि पुढे कुजतो कसा? (माझ्या कंप्युटरच्या जातबांधवानी आत्तापर्यंत SDLC, PDLC, PMLC आणि बर्याच LCs पडताळून पाहील्या असतील. पण हे प्रकरंण जरा नवं आहे. म्हणजे आणखी कुणी हात नाही घातला एवढंच. बाकी शेकड्यानी अनुभवी सापडतील या क्षेत्रात). तर एका ब्लॉगरच्या जन्मापासनं त्याच्या पिकण्यापर्यंतचा काळ खंगाळून काढण्याचा यत्न.
बालवाडी - "रडा पडा धडपडा": बालवाडी म्हणजे सगळं कसं नवं नवं. प्रत्येक गोष्टीत कुतुहल. तसंच ब्लॉगरचं असतं. हे वाच ते वाच, इकडं नजर टाक, याला कमेंट टाक, त्याल रिमार्क दे, स्वत:च्या ब्लॉग साठी काहीतरी खरडून काढ, विसरून जा, .. परत बे एकं बे. असं बरेच दिवस चालतं. नाहीतरी वाचंन असेल तरच चांगलं लिखाण येतं. नाहीतर सगळं लक्ष्मीबाई टिळकांच्या "कांदबरि" सारखं. असेच दिवस पुढे जातात. बरंच वाचन झालं की मग मनाचे पोरखेळ सुरू होतात ... मॅडम भुस्कुटेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर "आपण का नाही लिहीत काहितरी?" असा एक चोरटा विचार मनात घर करायला लागतो. झालं. एकदा का मन या जगात उतरलं की बाहेर काढणं अवघड आणि याच अवस्थेत बिचारा व्लॉगर बालवाडी उत्तीर्ण. काढा पेढे. (च्यायला, बालवाडीचे पण पेढे का ... आम्हाला वाटलं पेढ्याचा हक्कं फ़क्त दोनदाच .. दहावी बोर्डात आल्या वर आणि पोरगा काढल्यावर. बरं आहे .. चालू देत. आपल्या बापाचं काय जातंय .. फ़ुकट भेटतंय तर खा ना गुपचूप)
इयत्ता पहिली - "अ आईचा, ब बाबाचा": एकदा पहिलीत आलं की सर्वात आधी ब्लॉगची अक्षरओळख व्हायला लागते. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. इंटरनेटच्या शाळेत नवनवीन मित्र / मैत्रीणी मिळतात आणि बोबडे बोल बोलायला शिकतो. आपलं आपल्यालाच कौतुक वाटावं असं काहीतरी बोलत रहातो. बालवाडीतून पुढं सरकलं की नव्या जगात ब्लॉग या शब्दाची अक्षर ओळख पटते. भिंतीवर टांगलेल्या अक्षरांच्या calendar वरनं शिकलेली बाराखडीसारंखं काहीतरी नविन शिकल्यागत मन ब्लॉग बद्दल रोज शिकत जातं. अक्षरापासनं मग छोटी वाक्यं तयार करून "आई घर बघ, बाबा घर बघ ..." आणि असंच काही फ़रफ़टल्यागत सुचंत जातं. आणि एक दिवस बिचारा ब्लॉगर लिहायला बसतो. म्हणजे एकूण काय तर पहीलीची परीक्षा काही अभ्यास न करता उत्तीर्ण. इथं पेढे बिढे काही नाही. बालवाडीत कळालं की पेढे असे केंव्हाही नसतात तेंव्हापासनं आम्ही ठरवून टाकलंय .. आता पेढे सरळ दहावीलाच किंवा नंतरच्या पराक्रमालाच.
इयत्ता दूसरी - "ब्लॉग पहाव लिहून": ऊन्हाळ्याची सुटी संपवून शाळेत आलंकी कसं या विषयावर बोलू की त्या .. या बद्दल बोलू की त्या बद्दल .. अशी त्रेधातिरपीट ऊडते अगदी तसंच या दुसरीच्या ब्लॉगबहाद्दराचं होतं. डोक्यात हजार विषय घेवून तो लिहायला बसतो आणि घटकेत हा तर घटकेत तो विषय त्याला खाजवायला लागतो. आणि मग हे लिही draft save कर, ते खरड draft save कर .. असं होतं आणि हेsssss इतके मोठे drafts पडून रहातात .. पब्लीश किती तर शून्यं. मग एकेदिवशी सगळ्या ड्राफ्ट्सची होळी. निवडक ब्लॉग्स बाजूला काढून बाकी सगळे कचरापेटीत टाकून मोकळे. असेच मग काही दिवस हे वाच - ते वाच करत गेले की मग अचानक कळ ऊठते आणि एक ब्लॉग पूर्ण होतो ... भीत भीत तो पब्लीशही होतो ... या भीती पोटीच तर म्हटलंय ... "घर पहावे बांधून .. लग्न पहावे करून ... आणि ब्लॉग पहावा लिहून (जमल्यास पब्लीश करून)". तर अशा महत्त्प्रयत्ने जन्मा घातलेला ब्लॉग इंटरनेट वर झळकू लागतो. आणि मग आपलं दुसरीचं प्रगती पुस्तक हातात घेवून बालराजे माय, बाप, मित्र, मैत्रीणीना दाखवंत सुटतात.
इयत्ता तिसरी - "आधी लग्नं कोंढाण्याचं": दुसरीच्या निकालानंतर सगळ्यांकडनं जे cheering मिळतं, त्या जोरावर मग हा आपला तानाजी बिचारा गड शीर करायला निघतो. पण त्याला कुठं ठावुक असतं की रस्त्यात खड्डे, टेकाडं आणि बरंच काही आहे. बाळबोध बळावर निघालेले आमचे तानाजी शेवटी समजून चुकतात इथं आपल्यासारखे शेकडयानी आहेत. पण शेवटी ऊगाच काय तो तानाजीच नाय .. असा धीर सोडून थोडीच परतेल. साला घोरपडीला लटकेल नाही तर शेल्याची ढाल करेल, पण गड सोडणार नाही. मग selected विषयाला हात घालून लिहीणं चालू होतं. हळू हळू ब्लॉगींग सवयीचं होतं .. पण लिमिटेड सवयीचं.
इयत्ता चौथी - "लगे रहो मुन्नाभाई": ४ वर्षाचा पोरगा पाहिलाय का ... कसा नॉनस्टॉप बोलत रहातो ... तसे आमचे kiddo लिहायला शिकतात. मुन्नाभाई सारखं कोणत्याही विषयावर expert व्हायला शिकतात. प्रसंगी रात्र रात्र बापूवर वाचून जगायला शिकतात. आणि मिळेल त्या विषयाला आडवं करायची ताकद जमवायला शिकतात. नाहीतरी पुढल्या वर्षी पाचवी म्हणजे थोडं दांडगट व्हायलाच हंवं. बारा घरची बारा पोरं भेटणार आपल्याला वर्गात म्हणजे आपण पण पक्के असायलाच पायजे ना. म्हणून एखादा "सर्कीट" सोबत ठेवतात .. .अहॊ सह-ब्लॉगर हो. आणि विषयांची / विचारांची देवाण-घेवाण चालू रहाते. आणि हळू हळू मुन्नाभाई MBBS ची चौथी पूर्ण करतात. म्हणजे काय तर अस्खलीत बोलता वाचता येतं म्हणा की.
आणि मग पाचवी .. सहावी .. दहावी .. पेढे ... इत्यादी करत करत पोचतं ग्रॅजूएशन.
ग्रॅजुएशन / PhD / आणि बरंच काही - हे भले ग्रेट! धीरे धीरे मुन्नाभाई, तानाजी आणि बाळराजे ग्रजुएशन पर्यंत येवून पोचतात. या काळात विषय काय आहे याची काळजीच रहात नाही. द्या विषय आणि घ्या ब्लॉग ... काम कसं एकदम फ़टाफ़ट, म्हणजे Fedex च्या overnight deliveryला लाजवेल असं... ब्लॉग कसला अख्खं thesis पूर्ण होतं बघता बघता. आणि विद्यापिठात प्रथम क्रमांक यावा तसे ब्लॉग सर्च मधे वरल्या क्रमांकावर सापडू लागतात. आपलं नाव इंटरनेटवर असं वरच्या क्रमांकावर यावं म्हणून लोकांचे काय प्रयत्न चालू असतात ... त्यात आपला नंबर लागावा म्हणजे गगनातला आनंद तो. आपण एक "successful" ब्लॉगर ही कल्पनाच मनाल हिंदोळे देते ... आणि महाशय इंटरनेटवरच्या सागरात मस्त पोहू लागतात.
झालं. संपलं. वाजलं एकदाचं.
ऒSSSS .. कुणीतरी आवाज दिला बहुधा. काय म्हणालात? पुढे काय? काय पुढे!!! आरे हो ... आम्ही "लाईफ़ साईकल" म्हटलं नाही का... म्हणजे circle पूर्ण व्हायला हवं नाही? शुक्रिया remind केल्याबद्दल. नाहीतर आम्ही निघालॊ होतो हात झटकून आपले.. हं, तर होतं काय ... की एकदा ग्रॅजूएशन (आणि पोस्ट ग्रॅजूएशन) झालं की माणसाला वाचनाचं वेड लागतं म्हणतात (नाहीतरी वाचनाच्या वेडापाईच माणसं PhD बगैरे करतात). तर असा वेडा माणूस आणखी करेल काय? किती म्हणून स्वत:च लिहील आणि स्वत:च वाचेल ... म्हणून तो भरकटंत रहातो इंटरनेटवर ... हा ब्लॉग वाच ... तो ब्लॉग वाच .. याल कमेंट टाक .. त्याला रिप्लाय कर .. म्हणजे एकूण काय तर तीच भटकंती .... परत बालवाडी आणि पहीली सारखीच.
ईती BDLC!
हूश्शsssssssssssश्श!!!! शेवटी आमची "तुला गं" ची कथा ख"टर्रर्र" ख"टर्रर्र" करंत शेवटाला पोचली ... ... २५ वर्षानंतरच सही.