"Daddu, can spider man die?" एक अतीगंभीर प्रश्न अथर्वने विचारला. तुम्हा आम्हाला त्या प्रश्नाचं काही वाटणार नाही कदाचीत. पण त्या ४ वर्षाच्या मनाला ती कल्पना किती जखमी असेल याची कल्पना आपणाला करता येणार नाही. शेवटी काही झालं तरी स्पायडर मॅन त्याचा सुपर हिरो. well, "हे सगळं इथं मांडायचं कारण?" सांगतो. या साध्यासुध्या वाटणाऱ्या प्रश्नाचा आणि त्यानंतरच्या आमच्या संभाषणाचा समारोप अगदी अनपेक्षीत झाला.
मन, मग ते कितीही कोवळं का असेना, विचार करणं हे त्याचं काम. माशाला पोहायला किंवा वासराला दुध प्यायला शिकवायला लागत नाही. भुक लागली की खाणं आणि थकलं की जांभई देणं, दुखलं की रडणं आणि सुखलं की हसणं, हे जितकं नैसर्गीक अगदी तितकच नैसर्गीक म्हणजे मनाचं विचार करणं. मग त्याला वय किंवा कशाची अट नाही.
दिवसागणीक अथर्व वाढतोय. आणि वाढत्या वयाबरोबर आचार विचार वाढताहेत. रोज नवीन काहीतरी शिकणे आणि मग आचरणात आणणे हाच तो काय त्याचा एक्सपिरीअन्स. आणि या एक्सपिरीअन्सपायी तो कोण कोण प्रश्न विचारतो. मागच्याच ब्लॉगमधे मी त्याचे काही पराक्रम वर्णन केले. पण "त्यांना काय कळतं" या एका विचाराखाली आपण कितीतरी वेळा या बाल मनाच्या आशा, आकांक्षा, विचार आणि भावना दाबून टाकतो. पण अखेर जssराss विचार केला तर असं पटायला लागतं की त्या बाल मनात देखील अगदी तेच चालतं जे आपल्या so called जाणत्या मनात चालू असतं.
शेवटी भावना ती भावनाच. लहान पोरगा म्हणा किंवा एखादा जख्ख म्हातारा म्हणा. आणि मृत्यू सारखं सत्य अगदी प्रत्येकाला भयावहच वाटतं.
ऑगष्ट २४. मी, विजू आणि बाळराजे मंदिरात निघालो होतो. माझा ३२वा वाढदिवस, म्हटलं जरा देवापुढे डोकं टेकावं आणि पुढल्या आयुष्याची भीक मागावी. माझा वाढदिवस आहे हे कळाल्या पासून साहेबांनी कमीत कमी शंभरवेळा तरी मी किती म्हातारा झालो याची आठवण करून दिली असेल मला. असॊ. तर मी गाडी चालवत चालवत विजूशी कसल्यातरी विषयावर बोलत होतो. आणि अथर्व आपल्या कार सीट मधून दोन बोटे वाकडी करून माझ्याअंगावर स्पायडर-वेब टाकत होत. आणि मधेच "excuse me
daddu, can spider man die? Pranav says he does and I say no." बहुतेक प्रणव सोबत कसली तरी पैज लागली असेल. आता प्रणव पडला ६ वर्षाचा, म्हणजे २ उन्हाळे जास्ती पाहिलेले, पब्लिकस्कूल मधे जाणारा आणि अमेरिकेत राहिल्यानं स्वतंत्र विचार करायची सवय. म्हणून तो अगदी ठाम होता "Yes, Spider man dies". कधी, कसा, का, कुठे, केंव्हा .. कशाचा पत्ता नाही ... पण "yes, he dies" हे नक्की. आणि ते सारं अचानक आठवून अथर्वचा मला हा प्रश्न. मी थोडा विचार करून म्हटलं "हो". ४ वर्षाचा म्हटल्यावर त्याला आयुष्याचं सत्य सांगाणं हा माझा बापधर्म! पण म्हटल आपल्या पोराचा सुपर हिरो. उगीच हो म्हणून त्याला एक "common man" कशाला बनवा. म्हणून थोडं स्पष्टीकरण देत म्हणालो,
"You know. He saves lots of people and slowly he gets tired and grows old. When things get old, they become weak. Like you see that tree, it is growing big. And slowly it will grow old and weak and then it will die." म्हटलं पिल्ल्याला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. पण त्या नंतर जे झालं, देवा शपथ सांगतो, थरथरायला झालं.
माझ्या उत्तरावर "ओह" अशी प्रतिक्रीया देवून तो परत त्याच्या virtual web सोबत खेळता झाला. आणि परत एकदा उचकी लागल्यागत एकदम बोलला. "Daddu, so you are also growing old ... so you will also .." आणि पुढले शब्द त्याला उच्चारावेसेच नाही वाटले. "so you will also .... आवंढा .... I don't want to say it" असं म्हणून शांत झाला. मग कसलं वेब नाही की प्रश्न नाही. बापावीना आयुष्य काय असेल हे त्याला कदाचीत पहावलं नसेल. पोरका पोरगा म्हणून पुढे जे काही असेल ते कदाचीत त्याला जाणवलं असेल आणि नकोसं झालं असेल. पण एक मात्र खरं. त्याच्या विचारशक्तीकडं बघून मला जो कौतुकास्पद अभिमान वाटला तो इथं प्रकट करणं शक्य नाही. गळा दाटून आला आणि म्हटलं, एव्हाना मी "आय लव्ह यू" म्हटलं की "आय डोन्ट लव्ह यू, आय ओन्ली लव्ह ममा" म्हणत हसणारं चिमुरडं हे, इतका विचार करायला लागलं. मग हळूच गाडी बाजूला घेतली आणि त्याला म्हणालो, "बेटा, don't worry. I am not going to go anywhere. Mr God loves you a lot and he will take care of you."
मंदिरात पोचलो. आणि मग स्वतःसाठी काही मागायचं भानच कुणाला होतं. डोळे मिटले आणि त्या दगडाला म्हणालो, "बाबा रे, माझ्या सगळ्या इच्छा सोड. पण याच्या पूर्ण कर."
शेवटी मागल्या ब्लॉगच्या कमेंटमधे संवेदने म्हटल्यासारख "ही पोरं कधी कशी प्राण गळ्याशी आणतील हे सांगता येत नाही" किंवा "कधी प्राण कंठाशी आणतील" असं म्हणू का मी. तसं गळ्याशी काय किंवा कंठाशी काय, अर्थ एकच, पण बहुतेक भावना थोडीशी वेगळी. नाहीका!!
Thursday, September 6, 2007
Subscribe to:
Posts (Atom)