Thursday, December 10, 2009

आयडेंटिटी कॉन्फ़्लीक्ट

ऊद्या शुक्रवार ... म्हणजे तसा आजच ... पण आणखी झोपून उठून अंग धुवेस्तोवर आमचा गुरूवारच चालणार. तर म्हटलं शुक्रवार आला म्हणजे विकेंड सुरू झाला. आणि बऱ्याच दिवसात असं सवडीन सर्फ़ींग करायला नाही भेटलंय. म्हणून असा भरकटंत निघालेलो इंटरनेटवर. आणि एक मराठी ब्लॉग दिसला. आता बर्याच दिवसात काही वाचलं नव्हतं आणि त्यात परत मराठी ... जरा नोस्ताल्जीक व्हायला झालं .... जस जसा वाचत गेलो तो ते सगळं ओळखीचं वाटत होतं ... नाव गाव पत्ता चेक केला ... आणि पेटली. "तीच्या मारी ... हा तर आपलाच ब्लॉग की .... "

तारीख बघीतली ... दिड वर्षापूर्वी शेवटचं खरडलेलं .. मग म्हटलं "लेका, लिहीणं का सोडलस". पण हा काय मुर्खपणाचा प्रश्न ... मीच स्वतःला प्रश्न विचारतोय जेंव्हा मी खरतर ऊत्तर द्यायला हवं .... असो. पण म्हणून मग परत एकदा कागदावर "श्री गणेशा" करावासा वाटला.

हो ... तब्बल १८ महीन्याचा सन्यास. थोडासा जाणतेपणी, थोडासा विसरणीतला ... पण रेसेशन आणि काही अजाण चुका भोगायच्या लिहीलेलं होतं नशिबात ... म्हणून कदाचीत भरकटलेला. या १८ महिन्यात जे बघीतलंय त्याला साडेसाती शिवाय इतर काही नाव द्यायची हिम्मतच होत नाही. ही जर साडेसाती नसेल तर मग आणखी काय व्हायला पाहीजे. नोकरी, अस्थायीपणा, कौटुंबिक त्रास आणि काय हवं ते सगळॆ नको असलेले प्रकार .... सगळंच भोगून झालं. किंबहूना बर्याचदा असं वाटून गेलं की "साला आपण जगतोय ते आयुष्य आपलंच की दुसरं कुणाच". आरशातला चेहरा ऒळखीचा वाटतो नुसताच पण ओळख पटत नाही. आणि मग एकाएकी अशी एखादी रात्र लागते "आयडेंटिटी कॉन्फ़्लीक्ट" दूर करायला.

किती विषय, किती विचार मनात घर करून बसले असतील याची कल्पना न केलेलीच बरी. किती वेळा वाटलं असेल ... आज लिहावं, पण "समय से पहले और नसीब से जादा कभी किसी को नही मिलता". तश्यातला प्रकार. जमलंच नाही, सुचलंच नाही आणि झालच नाही. मेंदू कसा डीप फ़्रिजर मधे ठेवून काढल्यागत गोठून जायचा. विचारांची नळी बुच लावल्यागत जाम व्हायची आणि आतल्या आत गुदमरायला व्हायचं. विचार बोटाच्या टोकापर्यंत पोचलेच नाही कधी. मधेच कुठतरी विरघळून जायचे. आणि मग तीच भयाण पोकळी.

असॊ ... देर आये, दुरूस्त आये. प्रयत्नांती स्वतःची ओळख पटायला लागलीय आणि आयडेंटिटी कॉनफ़्लिक्टचा भस्मासुर गळून पडायला लागलाय. अजुन थोडा वेळ लागेल, बट ऍटलीस्ट द जर्नी हॅज स्टार्टेड. सो सी यू अराऊंड.