Thursday, August 21, 2014

ती ...

ती ...
तिचं हसणं, तिचं रूसणं
तिचं बोलणं, तिचं चालणं
सगळं कसं सहज ... प्रामाणिक

ती ...
तिचं प्रेम, तिचा राग
तिचा लोभ, तिचा त्राग
सगळं कसं लोभस ... लाडिक

ती ...
तिचा नाजूक बांधा जशी कळी
तिच्या गालावरली खळी
तिच्या ओठांच्या पाकळ्या
तिच्या केसांच्या साखळ्या
सगळं कसं सुंदर ... रेखीव

ती ...
तिच्या चुंबनाचा स्वाद
तिचा यौवनी आस्वाद
तिचा धुंद सुवास
तिच्या मिठीचा सहवास
सगळं कसं नशिलं ... मदमस्त

ती ...
माझ्या स्वप्नांची राणी
माझी प्रेमकहाणी
माझ्या ह्रदयाची चाल
माझ्या श्वासांची ताल

माझं जगण्याचं कारण
ती ...
ती ... फक्त माझी ....!!!!

- कोण?

Wednesday, August 20, 2014

दोलक

प्रेमाच्या दुराव्यात मनाचा दोलक 'हो' आणि 'नाही' च्या extremes मधे झुलत रहातो.... अशाच दोलकाची एक मनःस्थिति मांडण्याचा एक प्रयास
_______________________________________

आठवणींच्या रातींची ही
दर्द कहाणी सांगू कुणा,
गर्द प्रितिची एकच संध्या
सोडुनी गेली मर्म खुणा.

कधी बरसते तलम धार ती
कधी अश्रु भडिमार असे,
क्षणात भुरभुर चंचल वारा
कधी मनात वादळ स्वैर वसे.

मधेच अवखळ बिजली सम मन
सैरवैर हे तुझ्याकडे,
पुसून पाटी कोरी नव्याने
पुन्हा गिरविते जुने धडे.

नकोत नाती नको ही प्रिती
नकोत आशा जगण्याच्या,
परि मिठीत शिरण्या परत फिरावे
दारावरूनी मरणाच्या.

कधी दुरावा कधी अबोला
तरी संगती तूच हवी,
रातसरीची वाट पहातो
येईल प्रातः पुन्हा नवी....
... येईल प्रातः पुन्हा नवी.......
.......येईल प्रातः पुन्हा नवी..........

- कोण?

Friday, August 8, 2014

तृप्त

प्रेमाची परिसीमा पार करणारे प्रियकर अन प्रेयसीच्या एकांताची कहाणी सांगणारी एक छोटी कविता ...
______________________________________

रात्रीच्या गर्भात
चांदण्याच्या चादरीत
गवताच्या मखमलीवर
पहूडलेले .... फक्त मी आणि तू

रातकिड्यांची करकर
पानांची सळसळ
झर्‍याची खळखळ
शांत ... फक्त मी आणि तू

श्वासांची तगमग
ह्रदयाची धगधग
पापण्यांची लगबग
आतूर ... फक्त मी आणि तू

देहांचे वळण
मिठीची आवळण
स्पर्शांचे जळण
तप्त ... फक्त मी आणि तू

...
.....
.......

प्रेमाचे कडेलोट
वितळलेले ओठ
श्वासांचे विस्फोट
थंड ... फक्त मी आणि तू

अथांग आकाश
मंदावलेले श्वास
सुखावलेला त्रास
तृप्त ... फक्त ... फक्त मी आणि तू ....

- कोण?