"अक्षरश: पीक आलंय ब्लॉगर्सच. हेssssss इतके ब्लॉगर्स. इकडं ब्लॉगर्स तर तिकडंही तेच. हा ब्लॉगर तर तोही त्याचा भाचा नाहीतर कोणीतरी. आरे मानलं बाबा फ़्री आहे. म्हणून काय वाटेल तसं पेरंत सुटायचं.... " वगैरे वगैरे आणि असे बरेच काही विचार मनातून गेले. पण ज्या क्षणी मॅडम भुस्कूटेंचा ब्लॉग वाचला वाटलं चला आपण पण उडी मारून पहावी ... देवाशपथ .. फ़ाटली ... टर्रर्र (अगदी आवाजासहीत).
"टर्रर्र" शब्दावरून लहाणपणीचा एक प्रसंग आठवतो. पाचवी सहावीला असेन तेंव्हाचा. आमचे मोठे बंधू दोन वर्षानी मोठे. आणि मोठे म्हणजे सगळ्याच क्षेत्रात "मोठे". बंधुराजांनी शाळेतल्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला - मग वक्त्रुत असो की वादविवाद, कथाकथन असो की कविता लेखन, आणि बरंच काही - पहीले (आणि क्वचितं दुसरे) आलेच म्हणून समजा. बरं साहेबांचा मान असा की बक्षीस वितरणामधे सर्वात शेवटी यांना निमंत्रण स्टेजवर. का तर सगळ्या स्पर्धेचं एकच मोठं बक्षीस मिळायचं. तर अशा या "पराक्रमी" (पराक्रमी नाहीतर काय ... ज्या रस्त्याला आमची पायधूळ लागणं वर्ज्य तीथं साहेब घोडे चौखूर दौडवायचे म्हणजे पराक्रमंच म्हणावा) भावाकडं बघून वाटलं आपण ही कथाकथानामधे भाग घ्यावा. कथा निवडली "ही मोठी माणसं अशीच" (त्याला ही कारण म्हणजे बडे बंधू या कथेमधे पहीले होते म्हणून ... नाहीतर आम्हाला चॉईस हा प्रकार कधी जमतंच नाही). स्पर्धा सुरू झाली .. एक दोन तीन .. "n" स्पर्धक आले गेले ... आणि हुश्शं .. आमचं नाव आलं. कसलं आलंय. पावलांना कसतरी फ़रफ़टत स्टेज पर्यंत पोचवलं (तिथपर्यंत पोचवायला देखील मध्ये आई बाबा होतेच .. जा बेटा (आणि वाट लावून ये) असा "धीर" द्यायला). पण म्हणतात ना, रक्तात पाहीजे ... माईक समोर ऊभा राहीलो आणि सुरू झालं ... "तुला गं (शांतता) तुला गं ( थोडी जास्ती शांतता) mmmmm .... तुला गं (आणि more शांतता) " आणि असे बरेचसे "तुला गं .. शांतता... तुला गं .. शांतता". गाडी पुढे सरकेचना. संपली कथा. लोकांनी टाळ्या वाजवल्या (त्या टाळ्यांचा अर्थ पुढे कळाला. त्या बालवयात sarcastic हा शब्द ठावूकंच नव्हता ना). तीथून जो काढता पाय घेतला तो सरळ ईंजिनीअरींगच्या send off पर्यन्त माईक समोर गेलोच नाही. तर संदर्भ असा की तेंव्हा जी फाटली होती तीच आत्ता परत एकदा. (म्हणजे ... तशी कळ सवयीची आहे,पण वेळ नाहीये. बराच काळ ऊलटलाय).
महिना झाला (किंबहूना जास्ती) ... डोक्याचा तंबोरा वाजून वाजून अगदी वाट लागलीय. कोण डोकं दुखतंय म्हणून सांगू. पण आज "एकांतात" विचार करत बसलॊ होतो म्हटलं काही झालं तरी आपलं इंटरनेट वरचं अस्तित्व सिद्ध करायचंच. बराच "जोर" लावून विषय सापडला (विचारवंतांना मी जो "एकांत" आणि "जोर" म्हणतोय त्याची सवय असेलच. बाकी मायबाप जनतेनं माफ करा, पण असं पब्लीक डोमेन वर ऊघड ऊघड बोलता येत नाही) - "ब्लॉगर डेवलेपमेंट लाईफ़ साईकल". म्हणजे काय तर विषय शेवटी मीच अणि माझ्यासारखे बरेच.
विषयाचा सार असा की .. एखादा ब्लॉगर निपजतो कसा? बुजतो, रुजतो आणि पुढे कुजतो कसा? (माझ्या कंप्युटरच्या जातबांधवानी आत्तापर्यंत SDLC, PDLC, PMLC आणि बर्याच LCs पडताळून पाहील्या असतील. पण हे प्रकरंण जरा नवं आहे. म्हणजे आणखी कुणी हात नाही घातला एवढंच. बाकी शेकड्यानी अनुभवी सापडतील या क्षेत्रात). तर एका ब्लॉगरच्या जन्मापासनं त्याच्या पिकण्यापर्यंतचा काळ खंगाळून काढण्याचा यत्न.
बालवाडी - "रडा पडा धडपडा": बालवाडी म्हणजे सगळं कसं नवं नवं. प्रत्येक गोष्टीत कुतुहल. तसंच ब्लॉगरचं असतं. हे वाच ते वाच, इकडं नजर टाक, याला कमेंट टाक, त्याल रिमार्क दे, स्वत:च्या ब्लॉग साठी काहीतरी खरडून काढ, विसरून जा, .. परत बे एकं बे. असं बरेच दिवस चालतं. नाहीतरी वाचंन असेल तरच चांगलं लिखाण येतं. नाहीतर सगळं लक्ष्मीबाई टिळकांच्या "कांदबरि" सारखं. असेच दिवस पुढे जातात. बरंच वाचन झालं की मग मनाचे पोरखेळ सुरू होतात ... मॅडम भुस्कुटेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर "आपण का नाही लिहीत काहितरी?" असा एक चोरटा विचार मनात घर करायला लागतो. झालं. एकदा का मन या जगात उतरलं की बाहेर काढणं अवघड आणि याच अवस्थेत बिचारा व्लॉगर बालवाडी उत्तीर्ण. काढा पेढे. (च्यायला, बालवाडीचे पण पेढे का ... आम्हाला वाटलं पेढ्याचा हक्कं फ़क्त दोनदाच .. दहावी बोर्डात आल्या वर आणि पोरगा काढल्यावर. बरं आहे .. चालू देत. आपल्या बापाचं काय जातंय .. फ़ुकट भेटतंय तर खा ना गुपचूप)
इयत्ता पहिली - "अ आईचा, ब बाबाचा": एकदा पहिलीत आलं की सर्वात आधी ब्लॉगची अक्षरओळख व्हायला लागते. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. इंटरनेटच्या शाळेत नवनवीन मित्र / मैत्रीणी मिळतात आणि बोबडे बोल बोलायला शिकतो. आपलं आपल्यालाच कौतुक वाटावं असं काहीतरी बोलत रहातो. बालवाडीतून पुढं सरकलं की नव्या जगात ब्लॉग या शब्दाची अक्षर ओळख पटते. भिंतीवर टांगलेल्या अक्षरांच्या calendar वरनं शिकलेली बाराखडीसारंखं काहीतरी नविन शिकल्यागत मन ब्लॉग बद्दल रोज शिकत जातं. अक्षरापासनं मग छोटी वाक्यं तयार करून "आई घर बघ, बाबा घर बघ ..." आणि असंच काही फ़रफ़टल्यागत सुचंत जातं. आणि एक दिवस बिचारा ब्लॉगर लिहायला बसतो. म्हणजे एकूण काय तर पहीलीची परीक्षा काही अभ्यास न करता उत्तीर्ण. इथं पेढे बिढे काही नाही. बालवाडीत कळालं की पेढे असे केंव्हाही नसतात तेंव्हापासनं आम्ही ठरवून टाकलंय .. आता पेढे सरळ दहावीलाच किंवा नंतरच्या पराक्रमालाच.
इयत्ता दूसरी - "ब्लॉग पहाव लिहून": ऊन्हाळ्याची सुटी संपवून शाळेत आलंकी कसं या विषयावर बोलू की त्या .. या बद्दल बोलू की त्या बद्दल .. अशी त्रेधातिरपीट ऊडते अगदी तसंच या दुसरीच्या ब्लॉगबहाद्दराचं होतं. डोक्यात हजार विषय घेवून तो लिहायला बसतो आणि घटकेत हा तर घटकेत तो विषय त्याला खाजवायला लागतो. आणि मग हे लिही draft save कर, ते खरड draft save कर .. असं होतं आणि हेsssss इतके मोठे drafts पडून रहातात .. पब्लीश किती तर शून्यं. मग एकेदिवशी सगळ्या ड्राफ्ट्सची होळी. निवडक ब्लॉग्स बाजूला काढून बाकी सगळे कचरापेटीत टाकून मोकळे. असेच मग काही दिवस हे वाच - ते वाच करत गेले की मग अचानक कळ ऊठते आणि एक ब्लॉग पूर्ण होतो ... भीत भीत तो पब्लीशही होतो ... या भीती पोटीच तर म्हटलंय ... "घर पहावे बांधून .. लग्न पहावे करून ... आणि ब्लॉग पहावा लिहून (जमल्यास पब्लीश करून)". तर अशा महत्त्प्रयत्ने जन्मा घातलेला ब्लॉग इंटरनेट वर झळकू लागतो. आणि मग आपलं दुसरीचं प्रगती पुस्तक हातात घेवून बालराजे माय, बाप, मित्र, मैत्रीणीना दाखवंत सुटतात.
इयत्ता तिसरी - "आधी लग्नं कोंढाण्याचं": दुसरीच्या निकालानंतर सगळ्यांकडनं जे cheering मिळतं, त्या जोरावर मग हा आपला तानाजी बिचारा गड शीर करायला निघतो. पण त्याला कुठं ठावुक असतं की रस्त्यात खड्डे, टेकाडं आणि बरंच काही आहे. बाळबोध बळावर निघालेले आमचे तानाजी शेवटी समजून चुकतात इथं आपल्यासारखे शेकडयानी आहेत. पण शेवटी ऊगाच काय तो तानाजीच नाय .. असा धीर सोडून थोडीच परतेल. साला घोरपडीला लटकेल नाही तर शेल्याची ढाल करेल, पण गड सोडणार नाही. मग selected विषयाला हात घालून लिहीणं चालू होतं. हळू हळू ब्लॉगींग सवयीचं होतं .. पण लिमिटेड सवयीचं.
इयत्ता चौथी - "लगे रहो मुन्नाभाई": ४ वर्षाचा पोरगा पाहिलाय का ... कसा नॉनस्टॉप बोलत रहातो ... तसे आमचे kiddo लिहायला शिकतात. मुन्नाभाई सारखं कोणत्याही विषयावर expert व्हायला शिकतात. प्रसंगी रात्र रात्र बापूवर वाचून जगायला शिकतात. आणि मिळेल त्या विषयाला आडवं करायची ताकद जमवायला शिकतात. नाहीतरी पुढल्या वर्षी पाचवी म्हणजे थोडं दांडगट व्हायलाच हंवं. बारा घरची बारा पोरं भेटणार आपल्याला वर्गात म्हणजे आपण पण पक्के असायलाच पायजे ना. म्हणून एखादा "सर्कीट" सोबत ठेवतात .. .अहॊ सह-ब्लॉगर हो. आणि विषयांची / विचारांची देवाण-घेवाण चालू रहाते. आणि हळू हळू मुन्नाभाई MBBS ची चौथी पूर्ण करतात. म्हणजे काय तर अस्खलीत बोलता वाचता येतं म्हणा की.
आणि मग पाचवी .. सहावी .. दहावी .. पेढे ... इत्यादी करत करत पोचतं ग्रॅजूएशन.
ग्रॅजुएशन / PhD / आणि बरंच काही - हे भले ग्रेट! धीरे धीरे मुन्नाभाई, तानाजी आणि बाळराजे ग्रजुएशन पर्यंत येवून पोचतात. या काळात विषय काय आहे याची काळजीच रहात नाही. द्या विषय आणि घ्या ब्लॉग ... काम कसं एकदम फ़टाफ़ट, म्हणजे Fedex च्या overnight deliveryला लाजवेल असं... ब्लॉग कसला अख्खं thesis पूर्ण होतं बघता बघता. आणि विद्यापिठात प्रथम क्रमांक यावा तसे ब्लॉग सर्च मधे वरल्या क्रमांकावर सापडू लागतात. आपलं नाव इंटरनेटवर असं वरच्या क्रमांकावर यावं म्हणून लोकांचे काय प्रयत्न चालू असतात ... त्यात आपला नंबर लागावा म्हणजे गगनातला आनंद तो. आपण एक "successful" ब्लॉगर ही कल्पनाच मनाल हिंदोळे देते ... आणि महाशय इंटरनेटवरच्या सागरात मस्त पोहू लागतात.
झालं. संपलं. वाजलं एकदाचं.
ऒSSSS .. कुणीतरी आवाज दिला बहुधा. काय म्हणालात? पुढे काय? काय पुढे!!! आरे हो ... आम्ही "लाईफ़ साईकल" म्हटलं नाही का... म्हणजे circle पूर्ण व्हायला हवं नाही? शुक्रिया remind केल्याबद्दल. नाहीतर आम्ही निघालॊ होतो हात झटकून आपले.. हं, तर होतं काय ... की एकदा ग्रॅजूएशन (आणि पोस्ट ग्रॅजूएशन) झालं की माणसाला वाचनाचं वेड लागतं म्हणतात (नाहीतरी वाचनाच्या वेडापाईच माणसं PhD बगैरे करतात). तर असा वेडा माणूस आणखी करेल काय? किती म्हणून स्वत:च लिहील आणि स्वत:च वाचेल ... म्हणून तो भरकटंत रहातो इंटरनेटवर ... हा ब्लॉग वाच ... तो ब्लॉग वाच .. याल कमेंट टाक .. त्याला रिप्लाय कर .. म्हणजे एकूण काय तर तीच भटकंती .... परत बालवाडी आणि पहीली सारखीच.
ईती BDLC!
हूश्शsssssssssssश्श!!!! शेवटी आमची "तुला गं" ची कथा ख"टर्रर्र" ख"टर्रर्र" करंत शेवटाला पोचली ... ... २५ वर्षानंतरच सही.
Wednesday, May 30, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
mast lihila aahes pahila marathi blog :)
are...u too started?...keep writing
आरे बाबा .. started म्हणजे डोक्यात बर्याच दिवसा पासनं चालू होतं ... पण बसून लिहीयला जमंत नव्हतं. पण शेवटी धीर धरून मारली ऊडी ..दमछाक होतेय सध्या, पण होईल सवय.
changali suruwat keliye. pudhachya iyatta paTapaT chadhun PhD honya sathi shubhechchha!
Post a Comment