Friday, June 1, 2007

४ वर्षाचा सवाल!

अथर्वसोबत आजकाल काही बोलायचं म्हणजे मला भ्यायला होतं. बोलणं कमी आणि ऐकणं जास्ती आणि त्याहीपेक्षा जास्त विचार करायला लागणं. आमचा हा पहिलाच पराक्रम असल्यानं आणखी सवय झाली नाही. हो, ४ वर्ष झाली पण आत्तादेखील असं वाटतं हे कार्टं अजून नविनंच आहे. चेहरा आणि आवाज सोडला तर बाकी काही ओळखीचं नाही असं वाटतं. रोज काहीतरी नवंच रूप, नवा विषय, नवा प्रश्न.

अगदी परवाचीच गोष्ट. डिनर टेबलवर आमची हॅप्पी फ़ॅमीली (म्हणजे चिरंजीव, विजू आणि मी) "गिळायला" बसली होती. "गिळायला" हा शब्द महत्वाचा कारण जेवणाकडं कमी आणि गिळण्याकडंच जास्ती लक्ष होतं. बायकोनं परत आम्हाला गिनिपीग बनवायच्या ऊद्देशानं काहीतरी नविन पदार्थ ताटात टाकला होता. (खरंतर "विक्षीप्त" किंवा "विचीत्र" म्हणावसं वाटतंय, पण लहाणपनापासनं मातोश्रींनी शिकवलंय "जेवणाला नावं ठेवू नयेत" .. म्हणून संयम ठेवून "नविन" म्हणंण आलं) तेंव्हा "कसं झालंय" हा अतिशय प्रिय (यातला "तिशय" silent) प्रश्न कानावर पडण्याआधी ताटातलं पोटात टाकून आपला computer घेवून बसावा हा ऊद्देश. पण जे नशिबात लिहून आलंय ते टाळंणं का माणसाच्या हातात आहे (बायकांच्या असेल कदाचित). पोटातला अग्नी जरासा थंड पडला होता तेवढ्यात खडा सवाल, अगदी प्रेमळ आवाजात कानावर धाडकन येवून आदळला - "आवडलं?". (नेमक्या अशाच वेळी कसा तीला आवाज प्रेमळ काढता येतो हेच मला कळंत नाही. बाकीवेळा कानाची ओंजळ करून जरी वाट पाहिली तरी आवाज थोडादेखील प्रेमळ निघत नाही. anyway, तो एकूण वेगळाच विषय आहे). हं, तर प्रश्न येवून आदळला ... आणि घशातला घास घशात, हातातला हातात आणि ताटातलं सगळं घशात घुसल्यासारखं वाटलं. पण हे expected आणि सवयीचं असल्यानं पटकन "हं हं" असं तोंडातून निघून गेलं. पण जसा मला प्रश्न सवयीचा, तसंच तीला ऊत्तर आणि त्यात ती हुशार, समजून गेली आणि पुढलं जेवण काय hot होतं म्हणून सांगू. जावू देत, माझ्या सार्या उपवर मित्रांना हे माहितीच असेल. असा विषय सोडून जायची माझी किंचीतही इच्छा नव्हती, पण "बायको" म्हटलं की नेहमीच विषयाला सोडून असतं ... असो ...

हं तर डिनर टेबलवर हे महाभारत चालू होतं आणि बाळराजे "मात्रुभाषे"त वदले ... "daddu, where did I come from". (आमचे सुपूत्र आम्हाला "daddu" म्हणून संबोधतात .. daddy नाही की dad नाही ... कुठून शिकले माहिती नाही ... पण daddu. anyway स्वतःच्या पोरान काही म्हटलं तरी छानच वाटतं. तरी ऊगीच नाही म्हणाले थोर - आपला तो बाबल्या आणि दुसर्याचं ते कार्ट). मग आम्हाला ते विचार करण आलं. घास चावता चावता डोकं खाजवणं चालू होतं ... पण अशा प्रश्नांची सरळ ऊत्तरं देणं आवश्यक आहे नाहीतर पुढे चालून महागात पडतं म्हणे. आणि मी म्हटलं "मम्माच्या पोटातून". वाटलं नेहमीप्रमाणे "ओह!" असा उद्गार बाहेत पडेल आणि थंड पडतील .. कसलं आलंय ... लगेच एक सवाल ... "i am so big,
mumma's tummy is so small ... how did I fit in there". आणि मग दुसरं सत्र डोकं खाजवायचं आणि उत्तराचं. मग बरेचसे "why / how / when" झाले ... माय आणि बाप कुतुहलानं पोराच्या प्रश्नाची ऊत्तरं देत राहीले ... आणि या सगळ्यात एक फ़ावलं ... बायकोच "आवडलं का?" विरघळून गेलं.

बरं आमचेच साहेब हुशार आहेत असंही नाही. बहूतेक वर्षे ३-५ हा वयोगटच मुळात जिद्न्यासू असतो. माझ्या एका मैत्रीणीच्या घरी तीच्या बहिणीसाठी स्थळ पहाण्याचा विषय चर्चेत होता. तीचा ४ वर्षाचा पोरटा सगळं कसं मन लावून ऐकत होता आणि मधेच मुंगी चावल्यागत ओरडला ... "आई, बाबानी कुणाशी लग्न केलं गं". तीनं अगदी गालावर पापा देवून, हसून ऊत्तर दिलं "माझ्याशी". पण पुढं जे ऐकायला मिळालं ते कदाचीन कुणाही प्रौढ व्यक्तीच्या विचारशक्तीच्या बाहेरचं होतं .... "वेडेच आहेत बाबा ... घरातच लग्न केलं. नाहितर मावशी बघ कशी बाहेत करतेय." झालं. अख्ख्या घरात हशा.
हेच नग एके दिवशी आईला, "आई याला काय म्हणतात गं?" आईनं तत्परतेनं सांगीतलं, "पापण्या". "कशाला असतात त्या?" लगेच दुसरा प्रश्न." आईनं त्याच तत्परतेनं सांगीतलं, "डोळ्यात काही जावू नये म्हणून". या ऊपर काय म्हणाले असतील महाशय? "काही उपयोग नाहीये त्यांचा. डोळ्यात काही जावू नये म्हणून असतील तर मग अशा बाहेर कशाला आहेत ... खाली पाहीजेत ना ...". झालं. बिचारी आई खर्या अर्थानं अबला होवून निरूत्तर. पण त्या दिवसाआधी त्या आईला पापण्यांचा आकार कधीही जाणवला देखील नसेल.

असंच एका शुक्रवारच्या रात्री मी आणि विजू बोलत बसलो होतो. विषय होता "विकेंडला काय करायचं". इथं अमेरीकेत हा एक सर्वात मोठा प्रश्न. आरे २ दिवसांचा विकेंड तो. पण माणसं सोमवारपासनं शुक्रवार पर्यंत तेच ठरवतात ... "विकेंडला काय करायचं". तसं म्हटलं तर नुसतं झोपून राहीलं तरी २४ तास असेच कटतील. पण बायको म्हटलं की एक तर झोपू देणार नाही, जागेपणी आपल्याला जे करायचंय ते करू देणार नाही आणि तर अर्ध्या तासाला खेटेल "सांग ना काय करायचं ऊद्या?" तर अशा या महाबिकट विषयावर आमचं debate चाललेलं. मी विचारा आठवडाभर काम करून ("काम करून" बायकोसाठी, खरंतर स्वतःला बिझी ठेवून जास्ती) थकलेला, म्हटलं "आराम करू. बरेच दिवस झाले चांगली झोप नाही झाली". झालं भडकली. "तुला तर आराम करण्याशिवाय काही सुचतंच नाही. काढ नुसत्या झोपा. त्याच्यासाठीच लग्न केलंस. आठवडाभर ही घरी आणि विकेंडला ही घरीच ठेव". मला माझी चूक कळली (किंवा कळविण्यात आली) .. आणि मी काही बोलायच्या आधीच आमजे हिरो बोलले, "mumma, you dont like daddu, then why did you marry him. Why don't you marry me". बरं झालं बोलले ... पुढलं महायुद्ध टळलं आणि विषय हलका झाला. "करते रे बाळा तुझ्याशीच करते पुढल्यावेळी" असं काहीतरी गोजिरवाणं बोलून जवळ घेतलं त्याला. मी म्हटलं, "बाईगं, त्याला जीतका जवळ घेतेस तीतका मला ही घे. विकेंड काय रोज फ़िरवीन" आणि हसण्यात वेळ मारून नेली.

तर असे एक आणि कितीतरी प्रश्न रोज माय-बापांना भंडावून सोडतात. पण एक मात्र खरं. असले ४ वर्षाचे सवाल माझ्यासाठी मात्र वरदान असल्यासारखेच असतात. प्रत्येक वेळा माझी सुटका करतात. म्हणून हिला बोलायचं झालं की मी त्याला जवळ घेवून बसतो. आपलं शस्त्र तयार असलेलं बरं, नाहितर गळा कापला जायचा एखादेवेळी गाफिलपणे.

म्हणून अथर्वला म्हणाव वाटतं ... बोल रे माझ्या राजा.... तू असाच बोलंत रहा.

8 comments:

सर्किट said...

haa..haa.. :-) faar chhan lihilaye tumhi! ekdum paTyaa.

visited your blog for the first time today. ata tumachi adhichi sagali posts vachun kadhalich pahijet. :) will visit often now!

keep writing.

Vidya Bhutkar said...

Mastach :-)) !Maja aali vachun.
:-) Ashya prashnana roj uttar dyaycha mhanje avaghad aahe. @-@
-Vidya.

Nandan said...

dhamaal lekh aahe. majaa aali vaachoon. tumachi prasang sangaayachi shailee chhaan aahe.

Samved said...

ही ही ही:) पोरं कधी जीव गळ्याशी आणतील सांगता येत नाही. मस्तच...
मला वाटतं आपल्या generation पेक्षा ही पिढी जास्त जागरुक आहे. आणि जास्त "?" वाली सुध्दा!! आपण उत्तरं देतोचं की..

दुसरी गंमत म्हणजे, तुझ्या profile मधलीpicture ची लिस्ट. "आपली आवडं" असा कार्यक्रम आपण कधी केला होता का? कोणी येणार असेल तर Remember the Titans पाठवं की, इथे मिळत नाहीये:(. आणि हा Field of Dreams हा कोणता आहे? जरा माहीती टाक..

मध्यंतरी जरा हैद्राबादला + मुंबईला हिंडून आलो त्यामुळे जरा वेळ लागला comment टाकायला...

Meghana Bhuskute said...

ha ha haa haaa haaaaa haa ha ha! dhamal aali. :)

bageshri said...

hey g8888888 khup chaan lihil ahes. tula vel kadhi n kasa milto re evd sagl lihayla. khup chan lihitos tu

Dr. Vasant Matsagar said...

दिनेश, आज प्रथमच तुझ्या ब्लॉग ला भेट दिली आणि तुझे सर्व लिखाण एकाच बैठकीत वाचुन काढले. आणि खरं सांगू, संपावेसेच वाटतच नव्ह्ते. आपल्याच दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक क्षणात/प्रसंगातही कितीतरी उल्लेखनिय गोष्टी घडत असतात, पण आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या ते कधी दृष्टीतच नाही येत, त्यासाठी लेखकाचाच पिंड असावा लागतो, ह्याची पुरेपुर जाणिव तुझे सर्व लेख (ब्लॉग्ज्) वाचून झाली. प्रतिक्रिया तर सर्वच लेखांवर द्याव्याश्या वाटतायेत, परंतु सर्वांची मिळुन ही एकच देतो ... हा स्रोत असाच चालू ठेवावा, आणि आमच्या सारख्या पामरांना जिवनाच्या झारीतील हे शब्दरूपी जीवन प्राशन करण्याचा लाभ मिळत राहो हीच सदिच्छा.
स्नेहांकित,
वसंत मतसागर.

कोहम said...

wah...maja aali vachun...ajach tuza blog vachala.....sagalach likhan chaan aahe...