Sunday, June 24, 2007

भकास रात्र

"संगीत" हा शब्दच मुळी संगीतमय आहे. ऐकता क्षणी मनात विचारांची गर्दी व्हायला लागते. आणि "नेमके कोणते विचार" हे ठरतं ते या क्षणी मन कोणत्या संगीताचं भुकेलं आहे त्या वरून (आता तुमची कॉलेजातली एखादी संगीता असेल तर मग तुमची महफ़ील चुकलीय. आमचं बापडं वाजणाऱ्या संगीताबद्दल चाललंय, तेंव्हा पुढलं दार बघा). आणि त्यात जर ती गझल असेल तर मग काय सांगायचंय. मन मोहरून जातं एखाद्या गझलेवर, त्यातल्या कडव्यावर .. आणि अख्खी गझल किंवा कडवं सोडाच ... अगदी एखाद्या ओळीवर देखील मन घुटमळतं ... घुटमळतं ... आणि घुटमळंत रहातं. बर्याचदा तर भन्नाट प्रयत्नांनीही ते बिचारं पुढ सरकायला तयारच होत नाही, स्वतःचं शेपुट पकडू पहाणार्या कुत्र्यासारखी अवस्था होते अक्षरशः, शेवटी शेपूट गळून पडतं, कुत्र्याचे सात जन्म पुर्ण होतात, गतजन्मात भटकत असल्यागत पण मन मात्र पुढ सरकायला तयार होत नाही. आणि मग असा तो दिवस कधी प्रसन्न तर कधी अगदी सुन्न जातो.

आजचीच गोष्ट घ्या. अथर्वचा ४था वाढदिवस साजरा केला, दिवसभर थकून आडवा झालोच होतो आणि दारावर बेल वाजली. म्हटलं कोण असेल या वेळी. नाही म्हटलं तरी रात्रीचे २ वाजलेत. अशावेळी दार तर सोडाच, पण फोनची घंटा जरी वाजली तरी दचकायला होतं. मन कावरं बावरं झालं. पण जावून दार पहाणं आवश्यक होतं. म्हणून गेलो आणि दाराची कडी किलकिली करून पाहिली ... तर खूद्द जगजीत होता. म्हटलं, बाबा रे तुला काय चित्रा न हाकललं का गालीब नकोसा झालाय म्हणून तू अशा अवेळी ईकडं तडफ़डलास. तर म्हणे, मला ऊचकी लागली, मला वाटलं तुला आठवण झाली, म्हणून आलो. आणि वेड लागल्यागत गायला लागला ... "वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता ... किस घर मे खुशी..." झालं बोंबललं ... अख्ख्या रात्रीचं खोबरं करून टाकलं. त्याचा जड आवाज ऐकतच होतो तेवढ्यात आतनं आमची लता मंगेशकर म्हणाली, "कोण आहे आता ... झोप ना प्लीज". म्हटलं "बाईगं, तू होवून जावू देत तुझी झोप, माझी उडालीय." आणि मग परत जगजीतच्या सुराशी सुर जुळवला.

"वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता, किस घर मे खुशी होती हैं मातम नहीं होता"
खल्लास. आयुष्याकडच्या सुखाच्या सगळ्या अपेक्षा गळून पडल्या. मी जगत असलेल्या या क्षणाचा अर्थच बदलून गेला. आणि मन कुठ तरी खोल रुतून बसलं. आयुष्यात नाही म्हटलं तरी सुखच सर्व काही नाहिये असं सांगणारा जगजीत माझ्या डोक्यात घुमत राहीला बराच वेळ. गौतम बुद्धांनंतर असं काही सांगणारा हाच.

"ऐसेभी हैं दुनियामे जिन्हे ग़म नही होता, इक ग़म हैं हमारा जो कभी कम नहीं होता"
ना! दुःख्ख कुणाला नसतं. अगदी सर्वांनाच असतं. पण प्रत्येकाला आपलं दुःख्ख मोठं वाटतं. "माझीच लाल" म्हणणारी मंडळी आपण, इथंही मागं हटायला तयार नसतो. तुला एक तर मला दोन, तुला दोन तर मला दहा त्रास. आरे कुणाला सांगतो तुला काय होतंय ते. इथं माझंच आणखी सरलं नाही .. चल हो बाजुला, मला जरा माझ्या दुःख्खाला वाट करू देत.

"क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते, क्या मेहंदी लगे हाथोंसे मातम नहीं होता"


अगदी व्याकुळ झालं डोळ्यातनं अश्रु गाळायला. चटकन डोळ्यासमोर ती नवविवाहीत विधवाच आली. तीचं ते सगळं उद्वस्थ आयुष्य दिसायला लागलं आणि मन ऊद्विग्न झाल. मेहंदीने रंगलेले हात आणि रक्तानं रंगलेले डोळे ... नकोसं झालं ते चित्र ... सगळच कसं भकास दिसायला लागलं ... मनातली विलक्षण पोकळी भरायची कशानं तेच सुचेनास झालं.

"कुछ और ही होती हैं बिगडनेकी अदायें, बनने ही संवरने ही मे आलम नहीं होता"
छ्या ....! मन कुठं तयार होतं हे ऐकायला. ते मागल्याच ओळीवर अडकलं होतं. आणि माझा कुत्रा झाला होता. रात्रीच्या ३.०० ला देखील त्या विधवेच्या आयुष्याची राखण करायची जबाबदारी असल्यागत तीच्या भोवतीच फ़िरत होतं. "क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते" ... क्यों नही गिरते, जरूर गिरते हैं. लग्नानंतर बापाचं घर सोडून जाणारी ती बाला कोण रडते. आजपर्यंतची सारी खरी खोटी नाती मागे सोडून नवीन आयुष्यात पाय ठेवायचं दिव्य करायचं म्हणजे काय सोपं नाय. अगदी अनोळखी माणसावर विश्वास ठेवून पुढल्या आयुष्याची स्वप्नं रंगवताना येणारे नको ते विचार तीच्या मनाला कोण पीळ पाडत असतील. आणि असं सुरूवातीलाच सरणाला आग द्यायची म्हणजे त्याचा दाह अंतःकरणापर्यंत पोचणारच. आयुष्याएवढं मोठ दुःख्ख ते ("आभाळा"एवढं म्हणून ते दुःख्ख लहान करण्याची हिम्मत नाहीये आपली), ते पचवायचं म्हणजे बाईचं ह्र्द़य असायला पाहीजे. आणि अशावेळी मी स्वतःला नशीबवान समजतो की पुरूषाच्या जन्माला आलो. देवाशपथ, आपल्यात ताकद नाहीये हे असं काहीतरी सहन करायची. किंवा मग कदाचित देव स्त्रीजन्म देताना ते हवं असलेलं (की नको असलेलं म्हणू) धैर्यही देत असेल.

Anyway, देव करो आणि असा ग़म दुनियात कुणालाच न देवो.

पण एक न ऊलगडलेलं कोडं म्हणजे अशा शुभ दिनी मला हे असं जगजीतने का पछाडावं. आरे मेलं तरी पुरतील इतक्या सुंदर रोमटीक गझ़ल्स आहेत, मग हेच का भोसडायचं होतं तुला ... आणि तेही इतक्या रात्री. जा ना बाबा ... चित्राकडं जा आणि तीला म्हण, "ये करे और वो करे, ऐसा करे, वैसा करे ... " .. जैसा करायचंय वैसा कर .. पण इथनं निघ... हं, निघाला बिचारा शेवटी ३.४५ ला. .... डोळे जड झालेत माझे ... कदाचीत न झोपल्यानं असतील किंवा त्या विधवेचे डोळे उतरले असतील माझ्या डोळ्यात ... थकायला झालंय. "बाय". ये परत कधीतरी. टेकतो आता.

[नोट: कुणीतरी मला "बर्याचदा" किंवा "करणार्या" हे शब्द मराठी फ़ॉन्ट मधे कसे लिहायचे त्याच key sequence सांगा रे प्लीज. या "र" आणि "य" च लग्न मला लावताच येईना झालंय]

5 comments:

Meghana Bhuskute said...

barxyachadaa!!! :)))))

Meghana Bhuskute said...

("आभाळा"एवढं म्हणून ते दुःख्ख लहान करण्याची हिम्मत नाहीये आपली)

bhannat.

Sneha Kulkarni said...
This comment has been removed by the author.
Sneha Kulkarni said...

Sahi!! baki kahi lihun tyacha effect nahi ghalvaychay..

Unknown said...

खूप सही ब्लॉग आहे तुमचा!! ही पोस्ट सुंदरच आहे, आणि वरची उगीचच लिहीलेली सुद्धा...
लिहीत रहा!!