"आरं ए गनप्या. ते कोंबडं पळालं बघ. धर तेला. सांच्यासाठी धाडलंय परश्यानं. गेलं पळून तर रातच्याला परेशानी हुईल ... पळ पळ बिगी." सकाळी सकाळी बिडी शिलगावत रामाण्णानं हाक दिली. आज कामावर जायचं नसल्यानं सगळंच कसं निवांत चालू होतं. उठू उठू म्हणंत चांगलंच उजाडलं होतं. पण रामाण्णाला मात्र उठवत नव्हतं. रात्रभर शांतेन झोपू दिलं नव्हतं. ती गेल्यापासनं नाहीतरी तो जरा थंडावलाच होता.
रामाण्णा म्हणजे गावातला हरकाम्या माणूस. शांत बसणं हे त्याच्या खाक्यात नव्हतंच. बापदादांकडून वडिलोपार्जीत आल्या सारखा हा गुण त्यानं चांगलाच जोपासला होता. वेळ मिळाला की काहीबाही करत रहायचं हेच त्याला ठावूक. दिवसभर दामाजीच्या शेतात राबून घरी परतलं की शांतीच्या हातचं गरम गरम खायचं आणि मग चावडीवरच्या टवाळ मंडळीला नमस्कार टाकून कसल्या ना कसल्या उद्योगाला लागायचं हेच रोजचं जीणं. मग कधी कुणाला मदत लागली तर सगळे कसे हक्कानं म्हणायचे, "बिनघोरी बगा. रामाण्णा हाय की हातभार लावायला". मग कुणाचं खळं बडवणं असो नाहीतर रंभाच्या म्हशीचं दुखणं असो, कुंदीच्या सासरवाडीचं गाऱ्हाणं असो किंवा रखमा आजीची देवपुजा. रामाण्णा सगळं कसं जातीनं करायचा. परश्याच्या पोरीच्या, जनाच्या, लग्नात एकट्यानं सगळ्या वरातीची सोय बघीतली होती. कुणाला काही कमी पडू दिलं नाही. काय झक्कास व्यवस्था केली होती .. जणू काय त्याचीच पोरगी होती ती.
नाही म्हटलं तरी जना त्याला आबाच म्हणायची. गावातल्या शेंबड्यापोरासकट थोर म्हाताऱ्यांचा "रामाण्णा" जनाचा मात्र "आबा" होता. आणि त्याला ही ते आवडायचं. लहानपणापासनं आबा आला की जना खुललेली असायची, त्याच्याच भोवती फ़िरत रहायची. रामाण्णापण परश्याकडं निघाला की खिशात चने, गोळ्या किंवा एखादं बिस्कीट असं काहीबाही हमखास ठेवायचा. कधी विसरलं तर हिरमुसलेली जना त्याला पहावायची नाही. बऱ्याचदा तर परश्यानं हाकलल्या शिवाय ती त्याला सोडायचीच नाही. "जने, जा की बाहेर खेळ नायतर तुझ्या माईला काय मदत पायजे का बघ. च्या करायला सांग आन घेवून ये". जना गेल्या शिवाय परश्या आणि रामाण्णाला बोलायला भेटायचं नाही. पण जना गेली की एक विचीत्र पोकळपणा रामाण्णाला जाणावायचा. आणि मग अस्वस्थ होवून कधी कधी तोच म्हणायचा "अरं बसू दे की. उगाच का खवीस खातूस तीच्यावर".
रामाण्णाचं हे देवासारखं वागणं शांतेला मात्र पटायचं नाही. तीनं कितीतरी वेळा त्याला बोलून दाखवलं असेल "अवं असं रामावनी नाका ऱ्हावू. लोकं काय तुमी चांगले म्हणून न्हाई बोलवत तुमाला. उगं काम कराया फ़ुकट हात मिळत्यात म्हणून रामाण्णा रामाण्णा करत्यात." तीला वाटायचं आपला नवरा इतका थकून येतो, मग जरा शांत बसावं, आपल्याला जवळ घ्यावं, बोलावं, आणि बरच काही. नाही म्हटलं तरी तीला नवऱ्याशिवाय होतंच कोण. महामारीत माय बाप गेले. आणि मग मावस की चुलत की मावस-चुलत अशा कुठल्या मामानं सांभाळला तीला. वयात आली तशी गावतल्या पाटलामार्फ़त रामाण्णाला गाठला आणि दिली हवाली करून. लग्नानंतर कुठल्याश्या कारणावरून गावात उठलेल्या वादळात, तो होता नव्हता तेवढा मामापण गेला. आणि शांती सारं माहेर हरवून बसली. तेंव्हापासनं रामाण्णा हेच सर्वस्व होतं तीचं. लग्न करून आली तेंव्हा शांतीला पाहून कितीतरी जणांना "रामाण्णाचं हे मागल्या जन्माचं पुण्य आहे" असंच वाटलं. तसं म्हटलं तर रामाण्णा या जन्मात पण काही कमी ’पुण्य’ करत नव्हता. रखमा आजीनं तर शांतीला नजर लागू नये म्हणून गावाबाहेरच्या भैरवाची पुजा केली होती. पण भैरवाच्या मनात काहीतरी निराळच होतं.
एक दिवस रखमा आजी सोबत भैरवाच्या दर्शनाहून परतताना शांतीनं रामाण्णाला पाहीलं. गडबडीत कुठतरी निघालेल्या रामाण्णाला आवाज द्यायच्या आधीच तो घाम पुसंत नजरेआड झालेला. शांतीच्या मनात चलबिचल झाली. आणि त्या रात्री झोपताना शांतीनं खोलात जावून त्याला विचारायचा प्रयत्न केला. पण "सांगतो नंतर कधी तरी" म्हणत रामाण्णानं विषय टाळला होता. दिवस उलटले. सगळं कसं आपसुकच निवांत झालं. पण वरवर शांत वाटणाऱ्या शांतीच्या मनातून काही तो दिवस जाईना. तेंव्हा एक दिवस तीनं हटकून रामाण्णा जवळ तो विषय काढला, " अवं, एक इचारायचं व्हतं". "हं" म्हणत रामाण्णानं कूस बदलली. "तवा तुमी गरबडीत कुटं गेला व्हता हे सांगीतलं न्हाई कदी ... म्या म्हणते असं लपवायसारखं ....." पुढलं काही ऐकायच्या आधी रामाण्णा उठून पायात चपला घालून बाहेर पडला होता. त्याला तो विषयच मुळी नको होता. पण परिणामी शांतीला अधिकच उत्सुकता लागून राहीली. पण रामाण्णाला असं रागात आणायला तीला आवडायचं नाही. नाही म्हणायला, तीला तो एकटाच होता. तो गेला की सगळं घर तीला खायला उठायचं. म्हणून मग तीनं तो विषय मनातनं काढून टाकयचं ठरवलं.
पण नशीबाचा फ़ेरा कुणाला चुकलाय का? एक दिवस रानातून घरी परतताना शांतीनं रामाण्णाला परश्याच्या गोठ्याकडं जाताना पाहीलं. हातात कसली तरी पिशवी घेवून अगदी आनंदात तो निघाला होता. त्याला आवाज द्यावा म्हणून शांतीनं तोंड उघडलं, तर गोठ्याच्या दारात परश्याची बायली उभी होती. आत जाताना तीनं रामाण्णाचा हात धरलेला शांतीनं पाहीला. आणि आभाळ कोसळल्यासारखं ती झपक़्अन खाली बसली. जरा शुद्ध आली तेंव्हा पटापट परश्याच्या गोठ्याकडं गेली आणि गोठ्याच्या भिंतीला कान देवून ऐकू लागली. रामाण्णाचा एक एक शब्द तीच्या मनाला कापत होता. "करू कायतरी शांतीच. तू नगस उगच ईचार करू. म्या बगतो काय करायचं ते. तीला न्हाई कळनार काई. आजपस्तोर कधी कळलंय का? आणि ती न्हाई माज्यावर शंका धरायची. तू फ़कस्त परश्याला सांबाळ. चल. निघतो म्या. तेवडं कापड मातर आपल्या जनीला दे. इसरू नगस. माजी पोरगी हाय ती ... तीला कायबी कमी पडू देवू नगस". ऐकून शांतीला घेरी आली. काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून परश्याची बायली आणि रामाण्णा मागे आले. बेशुद्धावस्थेतली शांती पाहून दोघांची शुद्द हरपली.
डोळ्यावरली सूज आवरत रामाण्णा गणाप्याकडं पहात होता. "मालक, हेला इथं टोपलीखाली ठिवतो. न्हाईतर जायचं पुना पळून". पण उघड्याडोळ्यानी गणप्याकडं बघणाऱ्या रामाण्णाला मात्र रात्रच सरत नव्हती. रात्रभर शांतीनं त्याला झोपू दिलं नव्हतं. "सोड मला मुडद्या. तुला असले चाळे कराया लाज न्हाई वाटली. म्या काय पाप केलं म्हणून ह्या अवदसेसंगट संसार मांडलास." आणि चिंचेखालच्या विहीरीत बुडताबुडता ती शाप देवून गेली ... "देव बघून घेईल तुला ... कधी सुखानं झोपू देनार नाय ... जगू देनार नाय .. जगू देनार नाय". सुजावलेले डोळ्यानं रामाण्णा कोंबडीकडं बघत होता आणि शांतीचा आक्रोश ऐकत होता.
4 comments:
too good!
How boring! :(
pan mala nahi watal boring... kharach. agadi oghawat lihilay... tulach nasel awadal tar matr kathin ahe... mag badlaylach haw..
gud one!!!
chane gosht aani ashaa kathaa gaavakde ghadalelyaahi aahet.
Post a Comment