Sunday, July 27, 2014

पाऊस

आज कोसळला                                         आज बरसी हैं
अगदी मुसळधार कोसळला,                        मुसलाधार बरसी हैं
चिंब चिंब भिजवूनी गेला                             और भिगा गई
जमीन अन आकाशाचा कोपरा न् कोपरा.        जमीं आकाश का कोना कोना

झाकलेल्या मुठीगत एकेक थेंब                      बंद मुट्ठीसम हरेक बूंद
आठवणींच्या पोतड्यासारखा,                      यादों की गठरी की तरह
प्रकाशाच्या वेगाने                                       बिजली से तेज
मनाच्या समुद्रावर कोसळला.                        दिल के समंदर पर बरसी हैं

थेंब फुटून उडणार्‍या ठिणग्या                       बूंदों के फुटते अंगार
जाळून गेल्या अंगाची कातडी,                        जला गये जिस्म को
अन उघड्या जखमांच्या तोंडावर                    उन्हीं जख्मों की मुंहपर
बुक्क्यांच्या मारागत कोसळला.                      मुक्कों जैसी जमके बरसी

धुवून गेला कोराकरीत                                   धुल गये पुरी तरहा
मनःपटलावरची अक्षरे,                                 दिलमे बसे मेरे जस्बात
अन् गालावर ओघळागत                               पर गालों पर आसूओंकी
एक लकेर सोडून गेला.                                  इक लकीर खिंच गई

असाच ... असाच बेभान कोसळला                 इस कदर बरसी है बेलगाम
पाऊस ...                                                   बारिश  ........
बाहेरही ... अन् आतही ...                             बाहरभी ... और ... अंदरभी
संततधार ....                                              लगातार .......

- कोण?

Friday, July 25, 2014

बाकी हैं

एक खुबसूरत दिल
इक सजी महफिल
वो मुस्कान हासिल
जल चुके।

प्यार के सफर
वो मेरे हमसफर
जो मेरे थे हरकदर
बिछड चुके।

सपनों के बाग
मुहब्बत के चिराग
अपने प्रेम राग
उजड चुके।

आखों की रंगत
अपनों की संगत
सपनों की पंगत
बिखर चुकी।

सांसों की सरगम
आहों की पडघम
दिल की धडकन
थम चुकी।

लेकिन ....

तेरा इजहार
आखरी इंतजार
कहीं हल्का सा प्यार
अभी भी ... अभी भी बाकी हैं।

- कोण?

Monday, July 21, 2014

मानवी मनाचं लाकडी खोकं

"नचिकेताचे उपाख्यान" ... माझ्या अतिशय निवडक पुस्तकांपैकी एक आवडतं पुस्तक. किती तरी असे प्रसंग तो नचिकेत सांगतो जे जनसामान्यांना कधी पटणारच नाहीत. पण आपल्या तुसड्या विचारांचं कुंपण सोडून ज...रा पल्याड पाहीलं तर तेच त्याचे विचार भव्य आणि पुढारलेले वाटू लागतात. कधी कधी वाटतं हे पुस्तक त्याच्या काळाच्या पुढे होतं की काय ... की काळंच याच्या मागे होता.

असंच एके ठिकाणी "तू एकाच वेळी असं एका पेक्षा जास्ती स्त्रियांवर कसा प्रेम करू शकतो आणि तेही एकिवरही अन्याय न करता" या त्याच्या मित्राच्या प्रश्नाचं उत्तर देताना हा नचिकेत काय बोलून जातो. "मानवी मन म्हणजे काही लाकडी खोकं नाही की आत कुणीतरी पहिले आहे म्हणून दुसरा कुणी आत येऊच शकत नाही". या विचारसरणीला आव्हान द्यायची ताकद माझ्या विचारात नव्हती तेंव्हा.

पण परवा असाच एका मित्रासोबत बोलत बसलो असता नेमका हाच प्रश्न समोर आला. खरंच मानवी मन हे लाकडी खोकं नाही का? खरंच ते इतकं लवचिक आहे का की एकाच वेळी एकाच जागी एकाच तिव्रतेने एका पेक्षा जास्त लोकांना सामावून घेवू शकेल? कि हा फक्त न कळत्या मनाचा खेळ?

बोलता बोलता मी बोलून गेलो, "मन शेवटी खोकंच. एका वेळी एका स्थानी एकच व्यक्ती सामावणारं खोकं. पण ज्या अर्थी एखाद्याच्या मनात एकाच वेळी एकाच नात्यावर - खास करून स्त्री आणि पुरूष प्रेमाच्या नात्यावर - एकापेक्षा जास्त व्यक्ती स्थानापन्न होतात त्या वेळी कुठंतरी जाणते-अजाणते पणाने पहिल्या व्यक्तीने ऊठून दुसर्‍या माणसासाठी जागा करून दिलेली असते. अन्यथा त्या दुसर्‍या व्यक्तीला दारात थांबण्या खेरीज पर्याय नसता."

बिचारा मित्र ... एकदमच शांत झाला. पण त्याच्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा सगळं सांगून गेल्या.

नचिकेता ... कसा रे तू असा.... बिनधास्त ... दिलखुलास. तुला खरंच असं जगता येतं की तू फक्त पुस्तकाच्या पानावरलाच हिरो. तत्वज्ञानातच जगणारा .... बाकी आम्ही सगळे आयुष्याची भरंड साध्या माणसासारखी सोसून संपणारे.

Wednesday, July 9, 2014

तू येशील ...

तू येशील अशी खात्री होती मला, म्हणूनच दारं अशी सताड उघडी टाकून वाट पहात बसलोय. प्रत्येक पायरव म्हणजे तुझीच चाहूल हे समिकरण किती वेळा सोडवलं अन कितीवेळा चुकलं हे माझं मलाच ठावूक नाही. जरा कुठं खुट्ट झालं की मन दारापर्यंत पळायचं, अन नेहमी प्रमाणे हिरमुसला चेहरा करून परतायचं. कितीतरी वेळा मीच त्याला सांगितलं की "बाबा रे, का अशी दमछाक करून घेतोयस? ती जर आली तर आत येऊन भेटल्या शिवाय जायची नाही." पण माझं ऐकेल तर ते माझं मन कसलं.

रात्र जसजशी सरकायला लागली तसं मन कावरंबावरं व्हायला लागलं. पण तुझी वाट पहाणं काही त्यानं सोडलच नाही.

अखेर पहाटे केंव्हा तरी अगदीच नाउमेद होवून ते शांत पडलं होतं. अन दार वाजलं. थकलेले डोळे किलकिले करून मी हळूच पाहिलं अन सगळी थकान गळून पडली. सुकून गेलेल्या रोपट्यावर पावसाचा शिडकावा झाल्यागत माझं मन पटकन तजेलदार होवून दारापर्यंत तुझ्याकडे पळत आलं. पण ....


पण तू त्याला पाहिलंच नाहीस. रस्त्याचा कडेला पडलेल्या धोंड्यागत दुर्लक्ष करून तू सरळ आत पळालीस. अन ते मात्र आसूसलेल्या नजरेनी तुला पाठमोरी न्याहाळत राहिलं. "का .. का म्हणून तू अशी अनोळखी वागलीस?" असं विचारायला ते मधे आलं. पण तू तर अशी धाय मोलकून रडतीयेस आणि तुझ्या पुढ्यात ते माझं निश्चल अबोल गार पार्थिव.

सुन्न झालं तुला असं पाहून. तू जसा माझा हात आत्ता पकडून ठेवलायंसना, तसा जर आधीच पकडशील तर आपण असे हातात हात घालून बागडलो असतो, फिरलो असतो, भन्नाट मजा केली असती. आणि प्रेम तर विचारूच नको. फक्त हातच काय पण अख्खी तूच माझ्या बाहूपाशात सामावून जगभर हुंदडली असतीस. एकमेकांचे श्वास ऐकत, पापण्या एकमेकांशी हितगुज करत, आणि ओठ ओठांना चुप्प करत कैक वर्षे आपण जगलो असतो. पण ते होणे नव्हते. आपला सहप्रवास हा असाच संपायचा होता बहुधा. पण एक वचन देतो मी तुला. तू आणि मी परत जन्म घेवून जोवर भेटणार नाही तोवर माझं मन असंच दारात तूझी वाट पहात राहील ... येशील ना तू? ... येशिलच .... यावंच लागेल.

Tuesday, July 1, 2014

प्रेमभाव

चंचल ललना, कातल नयना
स्मरण तयाचे, वेड लावतो
मनात अलगद गुदगुदणारा
लाडिक अल्हड प्रेमभाव तो

कांती नितळ, काया पातळ
देहा मधूनी, मधू वाहतो
गंध तयाचा माखुन घ्याया
मी चातकी वाट पाहतो

कवेत घ्यावे, हवेत जावे
प्रेम धुंदिच्या दवात न्हावे
ओठांना मग ओठ भिडऊनी
निशब्द राहूनि समरस व्हावे

कुशीत तुझिया हळुच शिरावे
तू अन मी मग एकच व्हावे
रोम रोम हे जावे पेटुन
द्यावे घ्यावे प्रेम-पुरावे

मन वेडे झाले स्पर्शाखातर
अश्वासम मग उधळत रहाते
तुझिया संगे प्रेमायुष्याची
दिस-रातीला स्वप्न पहाते

फक्त एकदा ...
फक्त एकदा येऊन बघशील
बहरून जाईल स्वप्न गाव तो
अन प्रिये तुलाही उमजून जाईल
व्यथित मनीचा प्रेम भाव तो

- कोण?