Wednesday, July 9, 2014

तू येशील ...

तू येशील अशी खात्री होती मला, म्हणूनच दारं अशी सताड उघडी टाकून वाट पहात बसलोय. प्रत्येक पायरव म्हणजे तुझीच चाहूल हे समिकरण किती वेळा सोडवलं अन कितीवेळा चुकलं हे माझं मलाच ठावूक नाही. जरा कुठं खुट्ट झालं की मन दारापर्यंत पळायचं, अन नेहमी प्रमाणे हिरमुसला चेहरा करून परतायचं. कितीतरी वेळा मीच त्याला सांगितलं की "बाबा रे, का अशी दमछाक करून घेतोयस? ती जर आली तर आत येऊन भेटल्या शिवाय जायची नाही." पण माझं ऐकेल तर ते माझं मन कसलं.

रात्र जसजशी सरकायला लागली तसं मन कावरंबावरं व्हायला लागलं. पण तुझी वाट पहाणं काही त्यानं सोडलच नाही.

अखेर पहाटे केंव्हा तरी अगदीच नाउमेद होवून ते शांत पडलं होतं. अन दार वाजलं. थकलेले डोळे किलकिले करून मी हळूच पाहिलं अन सगळी थकान गळून पडली. सुकून गेलेल्या रोपट्यावर पावसाचा शिडकावा झाल्यागत माझं मन पटकन तजेलदार होवून दारापर्यंत तुझ्याकडे पळत आलं. पण ....


पण तू त्याला पाहिलंच नाहीस. रस्त्याचा कडेला पडलेल्या धोंड्यागत दुर्लक्ष करून तू सरळ आत पळालीस. अन ते मात्र आसूसलेल्या नजरेनी तुला पाठमोरी न्याहाळत राहिलं. "का .. का म्हणून तू अशी अनोळखी वागलीस?" असं विचारायला ते मधे आलं. पण तू तर अशी धाय मोलकून रडतीयेस आणि तुझ्या पुढ्यात ते माझं निश्चल अबोल गार पार्थिव.

सुन्न झालं तुला असं पाहून. तू जसा माझा हात आत्ता पकडून ठेवलायंसना, तसा जर आधीच पकडशील तर आपण असे हातात हात घालून बागडलो असतो, फिरलो असतो, भन्नाट मजा केली असती. आणि प्रेम तर विचारूच नको. फक्त हातच काय पण अख्खी तूच माझ्या बाहूपाशात सामावून जगभर हुंदडली असतीस. एकमेकांचे श्वास ऐकत, पापण्या एकमेकांशी हितगुज करत, आणि ओठ ओठांना चुप्प करत कैक वर्षे आपण जगलो असतो. पण ते होणे नव्हते. आपला सहप्रवास हा असाच संपायचा होता बहुधा. पण एक वचन देतो मी तुला. तू आणि मी परत जन्म घेवून जोवर भेटणार नाही तोवर माझं मन असंच दारात तूझी वाट पहात राहील ... येशील ना तू? ... येशिलच .... यावंच लागेल.

1 comment:

Anonymous said...

🥺😟😓😔