अजातशत्रू ... अर्थात ज्याचा कुणीही शत्रु नाही असा तो.
अथर्व सोबत गाडीतून कुठं जायचं म्हणजे कोण्या अग्निवेश यज्ञा पेक्षा सोपं काम नाही. तिथं तो महात्मा आगीत विभूतिंची आहूति देत असतो. आणि इथं हा महात्मा तुमची विभूति बनवून प्रश्नांच्या यज्ञात तुम्हाला झोकून देत असतो. तेंव्हा त्याच्या सोबत जायचं म्हटल्यावर भगतसिंगासारखं "सर पे कफन" बांधूनच निघावं लागतं. तरी बरं त्याला पुस्तकांचं वेड आहे (गैरसमज नको ... माझा पोरगा बाकी सगळ्या कार्ट्यांसारखाच अभ्यासापासून शेकडो मैल दूर उभा असतो. पुस्तकाचं वेड फक्त गोष्टीच्या पुस्तकांपर्यंतच ... असो ...), तेंव्हा सोबत एखाद भलं थोरलं पुस्तक घेतलं की आम्ही सुटतो. किंवा कधीकधी मोबाईल वरचा व्हिडिओ गेम. बट देन यू कान्ट बि लकी ऑल द टाईम नो. आणि मग आम्ही तावडीत सापडतो.
तर परवा असंच त्याला मराठी शब्दांचे अर्थ सांगताना मी " अजातशत्रू ... अर्थात ज्याचा कुणीही शत्रु नाही असा तो" असं बोलून गेलो ... पण मग ऐकून पुढे जाईल तो अथर्व कसला. त्याचा अभ्यास म्हणजे खड्ड्याच्या रस्त्यावरचा प्रवास ... ब्रेक आणि गचके आलेच. तर मी अजातशत्रू त्याला सांगितलाच होता अन् त्याचा खडा सवाल ... "पण ते कसं शक्य आहे डॅडी? माणूस म्हटलं की मित्र आणि शत्रू दोन्ही आलेच. मग ...."
झालं ... खड्डा ... धडाम् ....
पण त्याच्या त्या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न माझ्या समोर होता. त्याला सरळ "बाळा, अभ्यासावर लक्ष दे" म्हणुन टाळावं की "अरे तो फक्त अर्थ झाला ..." असं म्हणून खड्डा टाळावा की शिल्लक केसापैकी दोन चार केसांची आहूती देऊन अगदी डिटेल मधे समजवावं ... किंबहुना समजवण्याचा प्रयत्न करावा. अखेर कृष्ण भगवान काही मूर्ख नव्हते ... चांगले बारा गावचे पाणी प्याले होते. तेंव्हाच तर सांगून गेले ... कर्म करो, फल की चिंता मत करो. फल तो आखिर मे आळीकोईच मीलेंगा ... वगैरे वगैरे .. तात्पर्य - मी फक्त समजवण्याचा प्रयत्न करू शकत होतो ... बाकी समजणं न समजणं आमच्या पठ्ठे बहाद्दरांवर डिपेंड होतं.
पण ... पळवाट घेईन तो "मी" कसला. शिक्षकी पेशातले मायबाप अन् आयुष्यातल्या अनुभवांनी एक किडा दिलाय जो कधी सरळ सोपे मार्ग घेवूच देत नाही. आणि मी खड्डा बघून गाडी चालवली ... म्हणजे सरळ खड्ड्यात. आणि डिटेल मधे समजावणं चालू केलं.
तर अजातशत्रू ... तर एखाद्याला कोणीच शत्रु कैसा असू शकत नाही.
मी : ती व्यक्ती इतकी लाडिक असावी की कुणालाही फक्त प्रेमच यावं
तो: म्हणजे माझ्या सारखी .... (फाॅलोड बाय खी खी खी ... )
मी: किंवा त्या व्यक्तीला कुणालाही बोलून पटवता आलं पाहिजे ..
तो: म्हणजे माझ्या सारखी .. (फाॅलोड बाय डबल खी खी खी ... )
मी: नाहिच तर शेवटी मग शत्रू पटला नाही तर इतकी ताकद इतकं सामर्थ्य हवं की समोरच्या कुणालाही गारद करता आलं पाहिजे आणि कुणाची समोर उभं रहाण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे ..
तो: म्हणजे माझ्या ....
मी: चुप्प बस रे ...
तो: ट्रिपल खी खी खी ....
पण खरंच अशा खिदळणार्या कार्ट्याला कसा कोणी शत्रू असेल ... अजातशत्रूच तो.
- कोण?